विनासायास मिळणारा पैसा ही चॉकलेटी आमिषं कशी असतात,आणि त्याला आपण कसे बळी पडत राहतो याचे अनेक अनुभव कधी स्वत:ला, तर कधी ईतरांकडून आयुष्यभर समोर येत असतात.तरी लोभ ही गोष्ट आर्थिक चक्रव्यूहात अडकवणारा मानवी जीवनातला असा एक चमत्कार आहे की त्या भुलथापांच्या करिश्म्यांमध्ये बोलणाऱ्या व्यक्तींचे खरे खोटेपण ओळखण्याच्या सत्विवेकबुद्धीलाही संपवण्याची ताकद असते.कारण त्याच्या पाठीमागे सहज मिळणाऱ्या पैशांच्या मोहाचे बळ चिपकलेले असते. मग हे लोहचुंबक जिकडे जिकडे फिरेल तिकडे सर्वत्र आपल्या जादुई संमोहनाने लोकांना गळाला लावण्याचे सामर्थ्य घेऊन खोट्यातील खरेपण दर्शविण्यात युध्दपादतळीवर काम करीत असते.अशाच प्रकारे गेल्या विधानसभा निवडणुका विक्रमी संख्याबळांनी जिंकून अनपेक्षित अशा दैदिप्यमान यशाने विजयी ठरलेल्या महायुती सरकारलाही अशाच लोहचुंबकांनी सत्तेत आणून बसविले.ईव्हीएमच्या सोबतीला लाडक्या बहिनी धाऊन आल्याने बहिणींची चिंता वाहणाऱ्या महयुतीतील भाऊगर्दीची सत्ता महाराष्ट्रात प्रतिष्ठापित झाली.
सरसकट सर्व बहिणींना लाडकी बहिणी योजनेतून मदती केल्या जातील अशी भरगच्च आश्वासने महायुतीच्या सत्ताधारी त्रिमूर्तींनी राज्यातील बहिणींना दिली.योजनेच्या विरोधात बोलणारांना गैरसमज पसरवून गरीब बहिणींना लाभांपासून वंचित ठेवणारे दुराचारी म्हणून संबोधने दिली.परंतू ज्याला गैरसमज म्हटले जात होते तिच खरी समज होती हे आता पुढे येत आहे.सरसकट पैसा वाटण्याची ही उथळपट्टी फक्त मतांची बेगमी होती. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठीच सरकारी तिजोरी वापरण्याचे हे अनाचारी अपव्यय होते.हे महाराष्ट्रातील अर्ध्याअधिक बहिणींना आता पक्कं समजणार आहे...! कारण अडिच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या आणि ज्या गाडीतून त्या बॅंकेत पैसे काढायला जात होत्या ती चार चाकी गाडी असणाऱ्या बहिणींचे या योजनेचे पैसे आता बंद केले जाणार आहेत.त्यामुळे आता कुठे या बहिणींना आपणास मायेचा उमाळा दाखविणारे भाऊ किती सत्त्यवचनी होते याचे अनुभव मतांची निवडणूक आटोपल्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या शासकीय निर्णयात कोणतेही बदल केले जाणार नाहीत असं अदिती तटकरे बोलल्या.परंतू त्यापुढे वापरलेल्या "परंतु" या शब्दाने मात्र जी भिती होती तिची माशी येथे शिंकली आहे. त्यामुळे पूर्वीची मतलबासाठी सरसकट पैसे वाटण्याची अंधाधूंदी आता संपविली जाणार आहे.
आजाराची भिती होती म्हणून औषध,परंतू त्यातून बाहेर आल्यावर आता औषधांची गरज नाही.मग सरकारी तिजोरीवर अवाजवी ताण का द्यावा? हे सत्ताधाऱ्यांचं स्वार्थी शहाणपण आता मरगळ झटकून पुढे आलं आहे. *त्यामुळे आता अर्जांची छाननी करून पात्र महिलांनाच लाडकी बहिणी योजनेचे लाभ सुरू राहतील.अडिच लाखाचे वर उत्पन्न आणि चार चाकी कार ज्यांच्याकडे आहे,त्या आवडत्या बहिणी आता मतदानानंतर अचानक नावडत्या ठरणार आहेत.चारचाकी गाड्या असणारांची परिवहन विभागाकडून माहिती घेतली जाणार आहे.*त्यांना अपात्र ठरवून या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.त्याचप्रमाणे आधारकार्ड व बॅंकखात्यात विसंगती,ज्यांच्या कुटूंबातून आयकर भरला जातो अशा महिलांची नावं सुध्दा वगळण्यात येतील असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहे* मग आम्ही मतापुरत्याच फक्त लाडक्या बहिणी होतो का? आता फक्त विजयी भावांचे सत्तेतील चेहरे पाहत राहण्यासाठी चक्क नावडत्या ठरलोत का? असे प्रश्न विचारण्यासाठी आता असंख्य लाडक्या पुढे येणार आहेत. परंतू या योजनेतील रू.१५०० मध्ये वाढ करून "आम्ही सत्तेत आल्यानंतर रू.२१०० प्रमाणे दरमहा देऊ" या आश्वासनाची पूर्ती करण्याची आवश्यकता आता सरकारला वाटत नाही.कारण साऱ्या विरोधकांना अद्भूत चमत्कारांनी भुईसपाट करत अनभिषिक्त सत्ता मिळाल्यावर आपलं कोणी बिघडवू शकत नाही हा अहंकार आता निर्माण झाला आहे त्यामुळे कोण बहिनी आणि कोण भाऊ ह्या जाणीवा ठेवणारी राजकारण्यांची जात नसते,हे सत्त्य पुढे येण्यास जास्त वेळ लागला नाही.म्हणूनच २१०० रुपयांच्या आश्वासनाचे काय झाले याचे उत्तर सुध्दा अदिती तटकरे यांनी दिलेच नाही. मग नियमात न बसणाऱ्या योजनांच्या नियमबाह्य खिरापती का वाटल्या गेल्या? अव्यवहार्य उथळणीचा भुर्दंड वसूल करण्याचे प्रकार सर्वसामान्न्य जनेतेच्या छाताडावर का बसविणार ? याची खरी उत्तरे देण्याची हिंमत सत्ताधाऱ्यांमध्ये आहे का?
सर्वसामान्न्य जनतेला भ्रमाच्या मायाजालात अडकवून ठेऊन आपल्या मतलबाच्या पोळ्या भाजण्यात राजकीय मंडळी किती निष्णात असते याची प्रचिती म्हणजे लाडकी बहिण योजना...! समाज,राज्य,अर्थव्यवस्था,वाढती महागाई आणि मतलबाच्या राजकारणासाठी जाती,धर्मांच्या भेदभावांनी निर्माण केलेली अराजकता याचा विचार होत नाही.याबाबत संवेदनशिलता न बाळगता वास्तव सत्त्य स्विकारणारांचा येथे दुष्काळ आहे.म्हणून जे फक्त पक्ष आणि नेत्यांची अंधभक्ती करतात ते म्हणत *"दोन पैसे बहिणींना मिळतात तर मिळू द्या.आपण पोटात दुखणं घेऊन उगिच कशाला आडवं यायचं?"* यासोबतच सत्त्याला अव्हेरून फक्त वेडगळ प्रेमापोटी केली केलेली ही जाती पातीची, पक्ष आणि नेते प्रेमाची ही भलावण होती. मग प्रथम सरसकट वाटप केल्यानंतर आता हा सवतासुभा का? याची उत्तरे त्यांनी पण द्यावित.परंतू कारण महागाईच्या आणि जीवनमानाच्या अनेक समस्यांच्या वणव्यातच ह्या पोळ्या चांगल्या प्रकारे शेकल्या गेल्या हे राजकारणातील महद्आश्चर्याचे एक मोठे "राज" होते. जनतेच्या घामाचा पैसा उपकाराच्या भावनांखाली दाबून त्यांनाचा वाटायचा.पैसाही त्यांचाच आणि सत्तेच्या लाभाची मतेही त्यांचीच. फक्त पुणे लूटून साताऱ्याला दान करण्याची ही उफराटी समाजसेवा! ती सुध्दा स्वत:च्या मालमत्तांना अबाधित ठेऊन,आपल्या संपत्तीमधील एक दमडी सुध्दा न हलवता फक्त भावनांचे गैरफायदे घेत खेळला जाणारा खेळ म्हणजे राजकारण...! माणूसपण हरवित फक्त मतलबाचे सत्ताकारण.
अशा अनिष्ठ पायंड्यांमधून समाजातील प्रत्येक माणसाला विकासाची खरी किरणे गवसतील का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था, हिंसाचार, अराजकता,लोकशाही आणि संविधानाच्या अवमुल्यनात हक्क प्राप्तीच्या आणि विकासाच्या समानतेचे प्रतिबिंब दिसण्याची अपेक्षा ठेवावी का? सर्वसामान्न्यांनी आर्थिक विषमता आणि फक्त अनंत समस्यांची ग्रहणंच पाहत बसावित, की डोकावलेल्या चंद्रकिरणांचा मनमुराद आनंद घ्यावा? लोकांना काय हवयं हे ओळखणे हा राजकारण्यांचा धर्म आणि तसेच कर्म असले पाहिजे. शेतकरी, सर्वसामान्न्य, छोटे उद्योजक, बेरोजगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी योजनांच्या तात्पूरत्या मलमपट्ट्यांपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची ईच्छाशक्ती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे.नाही तर फक्त निवडून येण्यासाठी घोषणांचे पाऊस पाडायचे.योजनांचा महापूर आणत स्वत:च्या सत्ताकारणासाठी जनतेची तिजोरी कारणी लावली जाते. ही सामाजिक साधना हाच माणसांचा धर्म म्हणता येईल का? या सत्त्याकडे कानडोळा करीत अनेक अनिष्ट पायंड्यांनी कुठे नेऊन ठेवणार आहात हा महाराष्ट्र? स्वत:च्या सत्तेतील स्थानापलिकडे याची चिंता कुणाला आहे का? असेल तर नियोजन जाहिर करावे आणि कामाला लागावे.मग या वाटचालीतून आम्ही सगळ्यांचेच लाडके कसे आहोत हे कृतिशील सामर्थ्यातून महाराष्ट्रातील जनतेला पटवून द्यावे...! जनता...मतदार याचीच अनंत वर्षापासून वाट पाहत आहे.त्यासाठी मागील निष्क्रीय होते ही धुळफेक करण्यापेक्षा जनतेच्या अंतरंगात आपल्या सक्रियतेची आणि खऱ्या लाडकेपणाची नोंद करावी...!
संजय एम.देशमुख (निंबेकर),पत्रकार,अकोला
मोबा.क्र ९८७१३०४५४६
आपल्या प्रतिक्रिया द्या....