सावली वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार केल्याप्रकरणी सावली येथे वेगळा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व आरोपींना सावली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी ठोठावली आहे.
विशेष म्हणजे, या सर्व आरोपींना यापूर्वीच आसाम राज्यातील गुवाहटी येथून वन विभागाने अटक केली होती.वाघांच्या शिकारीची टोळी देशपातळीवर सक्रिय आहे. या शिकार प्रकरणात आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या शिकार प्रकरणाच्या तपासाकरीता वनविभागाने स्पेशल टास्क फोर्स गठीत केली आहे. या टास्क फोर्समध्ये वन अधिकार्यांचा समावेश आहे. या शिकारी टोळीने गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाची शिकार केल्याचे समोर आले होते.
आसाम राज्यातील गुवाहटी येथे आरोपींना अटक केल्यानंतर तेलंगाणा राज्यातील करीमनगर येथून काही आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडूनच सावली येथील शिकार प्रकरण समोर आले. त्यानंतर या आरोपींवर सावली येथे वाघाच्या शिकार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.Bavaria gang या सर्व आरोपींना मंगळवार 29 ऑगस्ट रोजी सावली न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने यातील रूमाली बावरीया, राजू सिंग व सोनू सिंग या तीन आरोपींना वन कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणाचा तपास चंद्रपूर वनविभागाची चमू व विशेष कृती दल यांच्याद्वारे करण्यात येत आहे. आजपर्यंत वाघ शिकार प्रकरणात 19 आरोपींचा समावेश दिसून आला असून देशपातळीवर देखील आणखी काही आरोपी असल्याची शक्यता आहे. वाघाच्या शिकार प्रकरणात सहभागी शिकार्यांचा कुठपर्यंत संबंध आहे, आणखी कोण कोण यात सहभागी आहे याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान आरोपींना वन कोठडी मिळाल्याची माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.