अकोला:- पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 93 वर्षी अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला. 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते आजारी आणि अंथरुणातचं होते. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.वन अधिकारी म्हणून वनखात्यात सेवा करून प्राणी जीवनाचे सूक्ष्म बारकावे आपल्या ओघवत्या लेखणीद्वारे चित्रित करणारे वनसंत श्री.मारुती चित्तमपल्ली यांचे आज दुःखद निधन
जंगलातील वैभव सांगोपांग अनुभवणाऱ्या अरण्य ऋषीनी विश्वातील समृद्ध अनुभव पुस्तकांद्वारे साध्या सोप्या शब्दांतून मांडले. प्राण्यांच्या, निसर्गाच्या दुनियेतील थरारक अनुभव त्यांनी आपल्या लेखणीतून जिवंतपणे वाचकांसमोर उभे केले. जंगलाच्या गाभ्याला थेट भिडणारा आशय त्यांच्या पुस्तकातून आढळतो. त्यांची पुस्तके वाचताना
रानवाटा तुडवत आपणही त्यांच्या सोबत चालतोय हा अनुभव येतो.
वनातील झाड, फळं. फुल, पशु,पक्षी, किडे, मुंग्या यांविषयी त्यांनी मुलभूत लेखन केले. व्यासंगात संपूर्ण आयुष्य झोकून दिले. उतारवयातही तन्मयतेने मग्न होऊन महाअचाट कोश संन्यस्त वृत्तीने तयार केले. सहासष्ट वर्ष त्यांनी जंगलात भटकंती करून पाच लाख किलोमीटरचा प्रवास केला. तेरा भाषांचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. तेलगू भाषिक चित्तमपल्ली यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे मराठीला एक लाख नव्या शब्दांची देणगी दिली.
प्राचीन संस्कृत साहित्यातील निसर्गाची अनेक रहस्ये, पक्षांबद्दल तसेच कूट प्रश्नांबद्दल त्यांनी गाढा अभ्यास केला. राजहंसाचे नीरक्षीरविवेक, चकोर आणि चांदणे, चक्रवाक किंवा चातक पक्षी यांचे गूढ उकलण्यासाठी त्यांनी प्राचीन साहित्याचा अभ्यास केला. संस्कृत भाषा ते शिकले. लोकसाहित्याचा ही त्यांनी अभ्यास केला. आज नव्वदीतही त्यांची ज्ञानतृष्णा अजूनही कमी झाली नव्हती.
वन्यजीवांशी निगडीत साहित्य निर्मिती करणाऱ्या श्री.मारुती चितमपल्ली यांना सोलापूर येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सोलापूर बाहेरचे असा आरोप त्यांच्यावर झाला. सुसंस्कृतपणा व मनाची ऋजुता कस्तुरीमृगप्रमाणे अंगी बाणलेल्या चित्तमपल्ली यांनी आरोपाबाबत मौन पाळले.
त्यांच्या काही पुस्तकातील निरीक्षणे अचाट करणारी आहेत. उंदीर चोरी कशी करतात? मुंगूस रस्ता ओलांडताना एकमेकांच्या शेपटाला धरून रस्ता कसा ओलांडतत ? पिसारा नसलेल्या मोराला मुकना मोर आणि हस्तिदंत नसलेल्या हत्तींना मुकना हत्ती म्हणतात. म्हाताऱ्या हत्तीला कळपात राहण्याची परवानगी नसते. तो डोहात जाऊन जलसमाधी घेतो. काळवीटांच्या कळपाचे नियोजन मादी काळवीट कशी करते? मादी कोकिळा गात नाही तर नर कोकीळ गातो. म्हणून लता मंगेशकरांना "गानकोकिळा" ही उपाधी लावणे चुकीचे आहे. अद्भुत आणि आश्चर्यकारक माहिती त्यांच्या पुस्तकात आपणास वाचावयास मिळेते.
सतत कार्यात सकारात्मक विचारांची ऊर्जाकोश असलेल्या श्री.मारुती चित्तमपल्ली यांनी वनजीवन विशद करणारी पंचवीस पुस्तके लिहिली आहेत. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाच देणं, केशरीगंध, रानवाटा, रातवा, घरट्यापलीकडे, चैत्रपालवी, निळावंती, सुवर्ण गरुड इ. पुस्तके आहेत. त्याचबरोबर चकवा-चांदणं ही निसर्गसाधनेतील आत्मपर लेखनही केले आहे. पक्षिकोश, प्राणीकोश, वृक्षकोश, मत्स्य कोश हे कोश वाडमय प्रसिद्ध आहे.
आपल्या वाचनालयात त्यांच्या पुस्तकांचा सर्व संच उपलब्ध आहे. तो वाचकांनी आवर्जून वाचावा नक्की आवडेल.
नागपूरच्या कर्मभूमीतून ते आता सोलापूर या जन्मगावी उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी आले होते.
नव्वदीकडे प्रवास करणाऱ्या अरण्यऋषींच्या व्यासंगाचा अग्निहोत्र कायम होता. तो आज कायमचा निमाला.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संतोष भोसेकर ,अजय जागीरदार अकोला
आपल्या प्रतिक्रिया द्या....