सिरोंचा तालुक्यातील चिटूर येथे महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित शासकीय योजनांची जत्रा कार्यक्रमावरून परत येताना रंगधामपेठा जवळील दुबापल्ली येथे ट्रॅक उलटून झालेल्या अपघातात लक्ष्मीदेवपेठा येथील तीनजण ठार तर २६ जण जखमी झाले होते. या अपघातातील मृतक व जखमीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री
अम्ब्रिशराव आत्राम यांनी आर्थिक मदत केली.
अपघातात मृत व जखमी कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची असून गंभीर जखमींना तेलंगणा राज्यातील रुग्णालयात भरती करण्यात आले. अपघातातील मृत व जखमी कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र अजूनही ही मदत मिळाली नाही. माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना ही बाब कळताच त्यांनी लक्ष्मीदेवपेठा येथे प्रत्यक्ष जाऊन मृत व जखमी कुटुंबीयांची भेट घेतली. लक्ष्मीदेवपेठा ग्रामपंचायत कार्यालयात मृत व जखमी कुटुंबीयांना मदतीची रक्कम सुपुर्द केली.