वाशिम : समृध्दी महामार्ग हा राज्य शासनाचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. आपल्या जिल्हयातून जवळपास 100 किमी समृध्दी महामार्ग जात आहे. समृध्दी महामार्गावर होत असलेल्या अपघाताची माहिती जिल्हा नियंत्रण कक्ष व जिल्हा प्रशासनाला मिळणे आवश्यक आहे.अपघाताची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्ष व जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासोबत अग्नीशमन दलाची मदत पोहोचविणे शक्य होईल.यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.
आज 30 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी समृद्धी महामार्गावरील रस्ते अपघाताविषयी संबंधित यंत्रणांकडून आढावा घेतला.यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, राष्ट्रीय महामार्गाचे उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे,जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधिकारी लक्ष्मण मापारी,मुख्याधिकारी निलेश गायकवाड,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता अतुल भोसले, नगरपालिका प्रशासन अधिकारी पंकज सोनवने व सहायक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या,समृध्दी महामार्गावर होणारे अपघात लहान अथवा मोठा असो,त्याची माहिती जिल्हा प्रशासन व जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळणे आवश्यक आहे. अपघाताची तात्काळ माहिती मिळाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत करता येईल व त्यांचा जीव वाचविता येईल. यासाठी समृध्दी महामार्गाला जोडल्या गेलेल्या गावात अपघातविषयी जनजागृती करावी.म्हणजेच अपघात झाल्यास त्याची माहिती तात्काळ मिळणे सोयीचे होईल.गटविकास अधिकाऱ्यांनी समृध्दी महामार्गावरील ग्रामपंचायतस्तरावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत कशी करता येईल यासाठी माहिती दयावी.समृध्दी महामार्गावर वाहनांना आग लागल्यास नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाने तात्काळ मदत करावी.जिल्हयात समृध्दीचे कारंजा,शेलूबाजार आणि मालेगांव हे तीन इंटरचेंज पॉईंट आहे.नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अग्नीशमन वाहनाची माहिती सादर करावी. वाहनात काही बिघाड असल्यास तात्काळ दूरुस्त करुन घ्यावे.अपघातग्रस्तांना आरोग्य विभागानी वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवावी.जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07252-234238 आहे.आपतकालीन परिस्थीतीत या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी केले.
दुरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या आढावा सभेला वाशिम, कारंजा व मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी,सर्व तहसिलदार,सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी,सर्व गटविकास अधिकार, सर्व अग्नीशमन अधिकारी,समृध्दी महामार्गावरील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक,सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची उपस्थिती होती.