कारंजा : स्थानिक युवा पत्रकार हाफिज यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ चे रात्री उघडकीस आली असून,या घटनेमुळे कारंजा तालुका परिसरात, सामाजिक,कला, पत्रकारीता क्षेत्रात खळबळ माजली आहे.त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अद्याप निश्चित माहिती मिळालेली नसली तरी त्यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांचे कुटूंबीयाकडून व्यक्त केला जात आहे.या घटनेनंतर नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चांना उधाण आले आहे.
मृत हाफिज हे संगीत,कला, पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून,अनेक सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर त्यांनी निर्भीडपणे लेखन केले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सहकारी पत्रकार, मित्रपरिवार तसेच समाजातील विविध घटकांकडून त्यांच्या संशयास्पद मृत्युबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. हाफिज यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून,त्यांच्या आठवणींना उजाळा देत नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी उप जिल्हा रुग्नालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात येवून त्यांचे पार्थीव कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले होते.सुरुवातीला हाफिज यांच्या संशयास्पद मृत्युला कारणीभूत असणाऱ्या आरोपींना अटक केल्याशिवाय पार्थीव ताब्यात घेण्याला त्यांचे निकटवर्तीयांनी नकार दिल्याने काही काळ तणाव दिसत होता. परंतु अधिकारी वर्गाकडून आश्वासीत करण्यात आल्याने तणाव निवळला.त्यानंतर त्यांचे पार्थीव त्यांचे निवासस्थानी नेण्यात येवून,मुस्लिम कब्रस्थान मध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आल्याचे वृत्त मिळाले असून, सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सर्वस्तरातून पुढे येत आहे.