वाशिम : वसुंधरेवरील प्रचंड प्रमाणात चाललेली जंगल वृक्षतोड,रस्ते व इमारती करीता होत असलेले पर्वत,पहाड, टेकड्यांचे सपाटीकरण,सिमेंटच्या अगडबंब इमारतीसह जमिनीचेही सिमेंटीकरण यामुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास,अमर्याद वाढलेले प्रदुषण जागोजागी वाढलेला प्लास्टिकचा कचरा आणि केवळ प्रवाह थांबलेले नव्हे तर नाहीसे झालेले नदी-नाले यामुळे पृथ्वीवरील वातावरणात पूर्णतः बदल होऊन,आपल्या पृथ्वीवर सुर्यमंडल अक्षरशः आग ओकीत आहे.त्यामुळे प्रखर उष्णतेने उच्चांक गाठून तापमानाचा पारा येत्या वैशाखात म्हणजे मे २०२५ मध्ये सरासरीच्या वर मजल गाठण्याची भिती व्यक्त होत असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी मांडले आहे. त्यांनी पुढे सांगीतले की, सध्याच्या वातावरणाचा अभ्यास केला तर सध्या उष्णता कमी होण्याची कोणतीच शक्यता नसून,उलटपक्षी येत्या वैशाखात म्हणजे मे महिन्यात,उन्हाळा अधिकाधिक तप्त होण्याचा अंदाज आहे.त्यामुळे एखादेवेळी उष्णतेच्या प्रमाणाने पन्नाशी ओलांडली तर नवल वाटायला नको.मात्र उष्णता जर अशीच वाढत राहीली तर त्याचा शेतजमिनी,नदी,नाले,विहीरी, धरणे,पाझर तलावं कोरडे पडून, विदर्भ मराठवाड्याच्या आणि उर्वरीत महाराष्ट्राच्या काही भागात पिण्याच्या पाण्याची भिषण पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. पाणी टंचाईच्या जलसंकटामुळे अनेक पशुपक्षी मृत्युमुखी पडण्याचीही शक्यता असून,अनेक ठिकाणी ग्रामिण भागात पिण्याच्या पाण्यासाठी वण वण भटकावे लागण्याची परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे मानवी जीवनालाही धोका निर्माण झाला असून, अनेक ठिकाणी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा अंदाज आहे.त्यामुळे उष्णतेच्या या संकटाचा सामना करतांना सर्वांत जास्त महत्व आपल्या व आपल्या कुटूंबीयाच्या आरोग्याकडे देणे आवश्यक आहे.त्यासाठी आपण भर दुपारी म्हणजे सकाळी ११ : ०० ते ०५ : ०० वाजेपर्यंत घराबाहेर जाणे टाळले पाहिजे. कुलर किंवा वाहनाच्या एअर कुल्ड वातावरणामधून लगेच उन्हात जाऊ नये. उन्हातून आल्या बरोबर लगेच आंघोळ, हात पाय धुणे किंवा थंडगार पाणी लगेच पिऊ नये.उन्हातून आल्यावर अर्धा तास घरात थांबून नंतरच आंघोळ करावी किंवा थंडगार पाणी प्यावे.उन्हाळ्याच्या दिवसात उपवाशी न राहता सकाळीच काहीतरी जेवण घेतले पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात मद्यपान किंवा तत्सम नशापान करू नये. मसालेदार भाज्या, मांसाहार करू नये.बाजारात मिळणारी कोल्ड्रींक न घेता ताक,दही, लिंबू शरबत, कैरीचं पन्ह, ऊस, संत्रा, मोसंबी किंवा पायनापल ज्युस,सोप आणि खडीसाखरचे शरबत, सोप धने किंवा जिऱ्याचे पाणी घेतले पाहिजे. जेवणात हलके जेवण घ्यावे. दुपार नंतर ताजे टरबूज, खरबूज,द्राक्ष अशी फळे घ्यावी. सुती,पातळ व ढिले कपडे घालावे. वेळप्रसंगी भर उन्हात बाहेर जातांना कानात कापसाचे बोळे ठेवावे. कान झाकले जातील अशा पद्धतीने डोक्याला टोप, रुमाल किंवा उपरणे गुंडाळावे. डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी गॉगल वापरावा. भिमसेनी कापूर व पांढरा कांदा खिशात ठेवावा व अधूनमधून त्याचा वास घ्यावा.घरच्या पिण्याच्या पाण्याची बॉटल सोबत ठेवावी.शेतमजूर, कारखानदार आणि बांधकाम मजूरांनी उन्हातान्हात काम न करता सकाळपाळी किंवा रात्रपाळीत कामे करावी.दुपारी ११ : ०० ते ०५ :०० पर्यंत तापणाऱ्या प्रखर उन्हात काम करून उष्माघाताचा धोका ओढवून घेऊ नये. उष्माघात झाल्याची शंका वाटत असल्यास सायंकाळी थंडगार पाण्याने आंघोळ करावी. कांद्याचा रस काढून भिमसेनी कापूर व कांदेरसाचा लेप अंगाला लावावा आणि तातडीने आपल्या फॅमिली डॉक्टरांची भेट घेऊन उपचार सुरु करावेत.असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे. पुढील काही दिवसात सदरहु उन्हाचा तडाखा वाढणार असून महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमानाचा उच्चांक ४८ ते ५० अंश सेल्सिअय राहणार असून खूप मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट भेडसावणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सावधानी व सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला आहे.