रिमझिम पाऊस मस्त सुरू सगळीकडे! थंडगार वारा सोबतीला...'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' हे गाणे गुणगुणत सकाळी सकाळी AOL केंद्रावर गेलो.सुदर्शन क्रिया झाल्यानंतर नेहमीसारखी गीता साथीला आली..सातवा अध्याय सुरू केला.आजचे श्लोक भारी, मस्तच! श्लोक सांगतो आणि तुमच्या आमच्या मनाला ते कसे छान औषध पुरवतात, ते तुमचे तुम्हीच पाहा!
श्रीभगवानुवाच:-
मय्यासक्तमना:पार्थ योगंयुञ्जन्मदाश्रयः।
असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छ्रुणु।।१।।
ज्ञानं तेsहंसविज्ञानंमिदंवक्ष्याम्यशेषतः।
यज्ज्ञात्वा नेह भूयोन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते।।२।।
अर्जुन हा तुमचा आमचा प्रतिनिधी.काहीसा confuse झालेला. आणि कृष्ण म्हणजे ठाम उत्तर! सर्वकालिक आणि निश्चित असे!
गोंधळलेल्या अर्जुनाला एकाग्र करण्याचा मानसिक प्रयोग या श्लोकात कृष्णाने केला. डॉक्टरकडे गेल्यावर प्रथम जसे डॉक्टर म्हणतो, "तू सारे माझ्यावर सोडून दे आणि आराम कर."तसेच कृष्ण या श्लोकात म्हणतो की," माझ्या ठिकाणी एकाग्र मन कर.मला जोडलेला राहा.माझा आश्रय कर. आणि समग्रतेने मला तू जसा जाणशील, तसे मी तुला उत्तर देईन. मग तुला मी विज्ञानासहित हातचे राखून न ठेवता सारे ज्ञान देईन. आणि मी भरभरून दिलेल्या ज्ञानानंतर जाणण्याजोगं काही उरतच नाही."
हा झाला सरळ अर्थ.आपल्यासाठी याचा उपयोग काय? तर कृष्ण म्हणजे निव्वळ महाभारत युद्धातील व्यक्ती असे न समजता हे लक्षात घ्यावे, की कृष्ण म्हणजे या नावाची व्यक्ती निर्माण होण्यापूर्वी साऱ्या universe मधून सर्वकाळ असणारी, एकवटत गेलेली आणि वसुदेव देवकीच्या पुत्ररूपात प्रकट झालेली सार्वकालिक दिव्यता. मनुष्याच्याअंतरंगात असलेल्या दिव्यतेच्या दिवा पेटवण्याच्या प्रवासाला आधार देणारी दिव्यता!
हा दिव्यतेचा प्रवास मनातून होत असतो. मनाला तेवढे बलशाली, प्रभावी करण्याशिवाय उपाय नाही! आणि मनाला आपण एकटेच एकट्याच्या भरवश्यावर नाही उभे करू शकत! हे जग अज्ञाताच्या आधारावर चालते.अचूक चालते! त्या अज्ञाताचा आधार घेण्याची सवय मनाला लावावी.तो अज्ञात आधार म्हणजेच श्रीकृष्ण! आणि आधार घेणारी तुमच्या आमच्यातली व्यक्ती म्हणजेच अर्जुन! ह्या अनंत अनंत पसरलेल्या विश्वाच्या पसाऱ्याला अचूकपणे चालवणारं असं काहीतरी या जगात निश्चित आहे. आपल्या समाधानासाठी त्या अज्ञात विराटाला कृष्ण म्हणता येईल.
जसे एखादे गणित सोडवताना 'समजा याची किंमत X आहे', असे आपण गृहीत धरतो आणि ते सोडवत सोडवत शेवटी X= संबंधित उत्तर,असा आपला प्रवास होतो.X हे केवळ आधार म्हणून आधी समजूत करून शोधत जाण्यासाठी घेतलेले प्रतीक आहे. तसाच परमेश्वराचा फोटो, मूर्ती हे X सारखे आधार म्हणून घेतलेले प्रतीकच आहे. त्यातून स्वतःच्या मनाला शोधता शोधता आपल्या स्वतःमध्ये असलेली दिव्यता सापडते. तिलाच आपण परमेश्वराचे दर्शन म्हणतो. हे शोधण्यासाठी त्या अज्ञाताचा आधार घ्यावा,म्हणजे तो आपल्याला वेळोवेळी ज्ञान देत राहतो. त्या अज्ञाताशी जोडलेले राहून प्राणीसुद्धा न शिकवता पोहतात.वाघ सुद्धा पोटदुखीच्या वेळी गवत खातो. हे कोणी डॉक्टर त्याला सांगत नसतं. भूकंपाच्या वेळी प्राणी प्रतिक्रिया देतात,पूर्वसूचना देतात. हे अज्ञाताशी असलेली कनेक्शन आपणही पुन्हा जोडले तर आपलाही सांभाळ अज्ञानातून बरोबर होतो.
आपल्या पद्धतीने जगण्याचा आधार देणाऱ्या त्या अज्ञाताला X Factor म्हणायचे का? त्याऐवजी श्रीकृष्ण असे म्हटले तर? त्या अज्ञाताचा आधार आपल्याला घेण्याचा रस्ता भगवद्गीता दाखवते. वरील श्लोकाचा आणखी अर्थ चिंतन करत राहिले, की सापडेल!
जय श्री कृष्ण!
श्रीनिवास राघवेंद्र जोशी कारंजा, जिल्हा वाशीम
आपल्या प्रतिक्रिया द्या....