चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना आयटक जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने राज्यव्यापी कॉल नुसार आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान व केंद्रीय आरोग्य मंत्री नई दिल्ली यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे गरीब, दुर्लक्षीत, गरजू जनतेला सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम, उत्तरदायी व विश्वासार्ह आरोग्य सेवा पुरविण्यासाठी २००५ साली राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान सुरू केले. सध्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये सुमारे ८ लक्ष आशा स्वयंसेविका व सुमारे ४० हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत.
सध्या देशस्तरावर आशा स्वयंसेविकांना माहिती व अहवालाचे अचूक संकलन व्होएचएनएससी ची मासिक सभा, व्हीएचएनडी व प्राथमिक आरोग्य स्तरावरील मासिक सभा या मंजूर कामाकरीता दरमहा २००० रु. मोबदला देण्यात येतो. या व्यतिरिक्त आशा स्वयंसेविकांना विविध कामांसाठी कामावर आधारीत मोबदला दिला जातो. याप्रकारे आशा ना दरमहा सुमारे ६००० रु. एकूण मोबदला मिळतो.
सुमारे २० आशा स्वयंसेविकांच्या कामाने पर्यवेक्षण करण्यासाठी गटप्रवर्तकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे काम पूर्णवेळ काम असून पदवीधर महिलांची या कामासाठी नेमणूक केली आहे. त्यांना प्रवासखर्च, टीएडीए मिळून केंद्र शासनाकडून दरमहा ८४७५ रू. मोबदला मिळतो. यातील बहुतेक रक्कम टीएडीए साठी खर्च होते, त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी काहीच रक्कम शिल्लक राहात नाही. त्यांना प्रवास भत्ता बरोबर कामाचा मोबदला किमान वेतन दिले पाहिजे. मोफत काम करून घेणे बंद करा.गटप्रवर्तकांना व आशा स्वयंसेविकांना मिळणारा मोबदला दारिद्रय रेषेखाली आहे. त्यांना वेठबिगारासारखे राबविले जात आहे.
गटप्रवर्तकांचे व आशा स्वयंसेविकांचे काम हे कायमस्वरूपी व आवश्यक काम आहे. त्यांच्यामुळे देशातील माता व बालमृत्यूचा दर कमी झाला आहे. त्या सर्वसाधारण जनतेपर्यंत सर्वसमावेशक आरोग्य सेवा पोहोचविण्या मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. त्या संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांचा प्रतिबंध करण्यास महत्वपूर्ण योगदान देतात. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कोविड १९ च्या काळांत केलेल्या कामाची दखल जागतिक आरोग्य संस्थेने घेतली. ग्लोबल लिडर अवॉर्ड २०२२ साठी भारतातल्या आशा स्वयंसेविकांची निवड केली होती. कोविड १९ च्या काळामध्ये गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ध्येयवादीपणाने केलेल्या कामाची आघाडीचे सैनिक म्हणून देशभर व जगभर प्रशंसा झाली.
अशा परिस्थितीत गटप्रवर्तकांना तृतीय श्रेणी देऊन व आशा स्वयंसेविकांना चतुर्थ श्रेणी देऊन कायम कर्मचा- याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आहे. त्यांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा. २०१८ पासून गटप्रवर्तक व आशा च्या मोबदल्यात वाढ झाली नाही .
कोरोना योध्याना किमान वेतन देऊन सन्मान करावा. गटप्रवर्तकांना दरमहा रु. २२००० व आशा स्वयंसेविकांना दरमहा रू. १८००० देण्याची तरतूद येत्या अर्थसंकल्पीय बजेट मध्ये करण्यात यावी अशी मागणी केली आहे .प्रलंबित मागण्यासाठी येत्या 6 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ.रवींद्र उमाटे जिल्हा सचिव कॉ.निकिता नीर ,शहर अधक्ष कॉ.सविता गठलेवार,अर्चना गेडाम, प्रेमीला बावणे, सुवर्णा खांडकर ,वंदना इटनकर, मनिषा खामकर,मेघा बांभळे,सुक्षा महेशकर,संजीवनी केरवटकर,शीतल वाळके, रंजीता सातपुते,मोहमदा शेख,परवीन सय्यद,अनिता थेरे,अनिता काळे,मंगला मडावी यासह आदी आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते .
आपल्या प्रतिक्रिया द्या....