अंतराळ आणि अंतराळात फिरणाऱ्या कोट्यवधी ग्रहांबद्दल मानवाला नेहमीच आकर्षण राहीले आहे. म्हणूनच जगातील अनेक देशांच्या स्पेस एजन्सीज या अंतराळातील काही अशक्य वाटणाऱ्या व डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टींवर संशोधन करत आहेत. मात्र हे संशोधन आजच सुरु झालेले नाही, तर गेल्या कित्येक वर्षांपासून हे संशोधन सुरू आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारा सर्वात पहिला मानव कोणता? हे जर कोणी आपल्याला विचारले, तर एका क्षणाचाही विलंब न करता आपण नील आर्मस्ट्राँग हे उत्तर देऊ. मात्र अंतराळात भ्रमण करणारा पहिला अंतराळवीर कोण? हे तुम्हाला माहित आहे का? हे जाणणे त्याहून गरजेचे आहे. वाचा "कृगोनि"- श्री कृ. गो. निकोडे यांचा महत्त्वपूर्ण लेख... संपादक._
अंतराळात काही आपात्कालीन स्थिती उद्भवल्यास किंवा इंजिनचा अपघात झाल्यास पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण रेषेत येण्यासाठी या अंतराळयानात सुमारे दहा दिवसांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अशी वेळच आली नाही. मिशन पूर्ण करून ते अंतराळवीर सुखरूप पृथ्वीच्या वातावरणात परत आले. मात्र सुरक्षित लँड करण्यासाठी यानाचे सर्व इंजिन काम करत नव्हते. त्यामुळे त्यांना सात किमीच्या उंचीवरून पॅराशूटने लँड करण्याची गरज पडली. तेव्हा ते कुठे सुखरूप परतले. या जगात भारी विक्रमामुळे गॅगारिन त्याकाळी सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले. मॉस्कोच्या पब्लिक प्लाझामध्ये लाखो लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यांचा हा विक्रम अख्ख्या जगाने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. हा पराक्रम बघून अमेरिकेला सुद्धा तोंडात बोटे घालण्याची वेळ आली होती.
युरी गॅगारिन असे या अंतराळवीराचे पूर्णनाव होते. दि.९ मार्च १९३४ रोजी त्यांचा जन्म रशियात झाला. ते एक सर्वसाधारण पायलट होते. दि.१२ एप्रिल १९६१ रोजी ते पृथ्वीची परिक्रमा करणारे पहिले मानव ठरले. सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या "व्होस्टोक-१" नावाच्या अंतराळ यानामध्ये ते अंतराळात गेले होते. त्यांनी या अतंराळ यानाने ताशी २७,४०० किमी वेगाने अंतराळातून पृथ्वीची परिक्रमा केली. हे उड्डाण तब्बल १०८ मिनिटे चालले. विशेष म्हणजे या घटनेला यंदा तब्बल ६१ वर्ष पूर्ण होत आहेत.
अमेरिका आणि सोव्हियत युनियन या दोन्ही देशांमध्ये संबंध फारसे चांगले नव्हते. हे दोन्हीही देश त्याकाळी अंतराळातील काही महत्वाच्या विषयांवर संशोधन करत होते. यामुळेच अंतराळावर नेमके अधिराज्य कोणाचे? यावरून दोन्ही देशांमध्ये अटीतटीची चुरस होती. अमेरिकेने चंद्रावर पाऊल ठेवल्यामुळे सोव्हिएत युनियनलाही अंतराळ क्षेत्रात मोठी कामगिरी करून दाखवण्याची इच्छा झाली. त्यामुळे ही अंतराळ भ्रमणाची मोहीम आखली गेली. यासाठी युरी गॅगारिन यांच्या अंतराळात जाण्यापूर्वी सोव्हियत युनियनने "व्होस्टोक-१" या अंतराळ यानाची एक प्रतिकृती बनवून अंतराळात पाठवण्याची योजना तयार केली. मानवाच्या आकाराचा एक डमी आणि एक श्वान अशा दोघांना अंतराळात पाठवण्यात आले. हा सराव यशस्वी झाल्यानंतर महत्वाच्या मिशनसाठी एका मोठ्या ट्यूबचा वापर करण्यात येऊ शकतो, असे सोव्हियत युनियनला समजून आले.
दि.१२ एप्रिल १९६१ रोजी सकाळी नऊ वाजून सात मिनिटांनी "व्होस्टोक-१" हे अंतराळयान युरी गॅगारिनसह लाँच करण्यात आले. पुढे काय होणार? याची काहीच कल्पना नसल्यामुळे या अंतराळयानात काही ऑनबोर्ड कंट्रोल देण्यात आले होते. तर इतर सर्व कंट्रोल पृथ्वीवरून करण्यात येणार होते. आपात्कालीन स्थिती आल्यास त्यांना एक कोड मिळणार होता. एकंदर ३२७ किमीच्या उंचीवर पोहोचल्यानंतर व्होस्टोक-१ या अतंराळ यानाने ताशी २७,४०० किलोमीटर वेगाने अंतराळातून पृथ्वीची परिक्रमा केली. हे उड्डाण तब्बल १०८ मिनिटे चालले. असा विक्रम करणारे युरी गॅगारिन हे जगातील पहिले व्यक्ति ठरले.
युरी गॅगारिन यांचा दि.२७ मार्च १९६८ रोजी मिग-१५ हे लढाऊ विमान चालवताना क्रॅश लँडिंगमुळे मृत्यू झाला. मात्र आज तब्बल ६१ वर्षांनंतरही त्यांच्या कामगिरीला जग विसरलेले नाही. त्यांच्या आठवणीत हा दिवस अजूनही साजरा केला जातो.
!! युवाक्रांती समाचार परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांना व त्यांच्या कामगिरीला विनम्र अभिवादन !!
- संकलन -
कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे, से.नि.अध्यापक.
मु. पो. ता. जि. गडचिरोली.
मोबा. ७४१४९८३३३९.
आपल्या प्रतिक्रिया द्या....