ज्या ठाणेदाराकडे न्याय मागायला जातात, त्यानेच अन्यायाची परिसीमा गाठण्याची घटना हिंगणघाट पोलीस ठाण्यात घडली आहे. स्वतःच आरोपीच्या पिंजऱ्यात संपत चव्हाण हा ठाणेदार सापडलेला आहे.
चोवीस वर्षीय युवतीने आपल्या पाच पानी तक्रारीत नमूद केल्यानुसार, एक तक्रार करण्यासाठी ती 5 ऑगस्ट 2021 ला हिंगणघाट ठाण्यात गेली होती. त्यावेळी सेवेत असणाऱ्या ठाणेदार चव्हाण यांनी तू माझ्याशी मैत्री केली तर तुझे प्रकरण मार्गी लावतो, असे म्हणत ओळख वाढविली. पुढे युवती घरी एकटीच असल्याची संधी साधून तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित केले. या खाकी वर्दीतील बहाद्दराने एवढ्यातच न थांबता एक व्हिडिओपण तयार केल्याचे युवतीने नमूद करीत त्या आधारे सतत ब्लॅकमेल केले व वारंवार अत्याचार केल्याची तक्रार केली.या प्रकाराला कंटाळून पीडितेने आरोपीच्या पत्नीस आपबिती कथन केली. मात्र, पत्नीनेही आरोपी पतीची बाजू घेत युवतीलाच फसविण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. यापूर्वी 21 डिसेंबरला पीडित युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्धेत पाठविण्यात आली होती. त्यावेळी ठाणेदार चव्हाण यांची वर्ध्यात तात्पुरती बदली झाली व हिंगणघाटला प्रभारी ठाणेदार नेमण्यात आले. परत तक्रार झाल्यावर चव्हाण यांच्यावर पाच वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नुरुल हसन म्हणाले, की या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.