वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे .) : केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील लाभार्थ्यांकरीता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटींची तरतूद केला आहे ही रक्कम लघु उद्योग विकास बँकेकडे (सिडबी) वर्ग करण्यात आली आहे. लघु उद्योग विकास बँकेने या रकमेचा सुरक्षा हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाईल त्याला लघु उद्योग विकास बँक हमी देईल. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक अर्जदारास स्टैंड अप इंडिया योजनेअंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित अनुदानाची १५ टक्के रक्कम राज्य शासन देणार आहे. यामध्ये १० टक्के रक्कम स्वहिस्सा राहील.
या योजनेच्या मार्गदर्शक सूचना ९ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार शासन स्तरावरून निश्चित करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या योजनेककरीता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे शासन निर्णयात नमुद करण्यात आलेल्या सर्व अटी व शतींची पूर्तता करून प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.