पवनी तालुक्यातील मांगली (चौ.) येथे गोठ्यात विद्युत प्रवाह उतरून विजेच्या धक्क्याने एक गाय व दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी घडली. सुदैवाने कुटुंबातील एका सदस्याच्या सतर्कतेमुळे कुटुंबीयांची प्राणहानी टळली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव चंद्रहास बावनकर असे आहे.
चंद्रहास यांच्या घरालगतच लोखंडी अँगलवर टिनपत्रे बसवून गुरांचा गोठा बनविला आहे. या गोठ्यावरून घरलाइनची सर्व्हिस केबल घातलेली आहे. स्पार्किंगमुळे ही केबल क्षतिग्रस्त झाली आणि गोठ्यात विद्युत प्रवाह बसला. प्रवाहित झाला. परिणामी गोठ्यात लहान बांधलेल्या तीन गायींपैकी एक गाय व दोन शेळ्या विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्या..बावनकर नेहमीप्रमाणे सकाळी पाचच्या सुमारास उठले. त्यावेळी त्यांना गोठ्यातील जनावरांचा आवाज ऐकू आला. त्यांनी गोठ्याकडे धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे कुटुंबीयांनी घाईगर्दीत गोठ्यात प्रवेश केला. परिणामी बावनकर यांची पत्नी व मुलगा भावेश यांना विजेचा धक्का बसला. मुलगा सूरज याने प्रसंगावधान राखून त्यांना सोडविले आणि मोठा अनर्थ टळला. यात भावेश जबर जखमी झाल्याने त्याच्यावर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत बावनकर यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. मांगलीचे तलाठी रामटेके यांनी घटनेचा पंचनामा केला.