कारंजा : सन 2014 च्या निवडणूकी नंतर मोठा गाजावाजा करीत शासनाने देशातील एकही व्यक्ती स्वतःच्या घरापासून वंचित राहणार नाही अशी घोषणा करून प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना सुरू केली होती. त्या अंतर्गत त्यांनी बेघर, भटकेविमुक्त, दिव्यांग व निराधार व्यक्तिंचा सर्व्हे सुद्धा केलेला होता. यापैकी अनेक भटके विमुक्त, दिव्यांग बेघर असून फुटपाथ वर किंवा मंदिर, संस्थान, मस्जिद किंवा दरगाह च्या आसपास किंवा धार्मिक संस्थानच्या जागेत राहणारे आहेत . त्यांचेकडे स्वतःच्या मालकीची जागाच नाही त्यामुळे त्यांच्या कडे नमुना ड नाही . त्यामुळे अशा वंचित घटकांना अद्याप पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेचा म्हणजेच घरकुल योजनेचा लाभ मिळालेलाच नसून आजही त्यांचा रहिवास फुटपाथवर किंवा धार्मिक संस्थानांच्या जागेत सुरू आहे. पुढे सन 2019 ते 2021-22 पर्यंत, कोरोना महामारी आली. व आता तर प्रधानमंत्री आवास योजनेची शासकिय स्तरावर कोठेही साधा विषयही निघत नाही किंवा चर्चा सुद्धा नाही. किंवा घरकुल मागणीची नोंदणी सुद्धा केल्या जात नाही . त्यामुळे हजारो बेघर, भटके विमुक्त, दिव्यांग व निराधार गरजू नागरीक प्रधानमंत्री आवास योजने पासून वाचिंत असून, स्वतः राज्य सरकारने घरकुल योजनेबाबत बेघरांना खोटी आश्वासने देत राज्य सरकारने बेघर, दिव्यांग, निराधारांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचे शल्य असल्याचे दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी म्हटले आहे.