तालुक्यातील खरकाडा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त सतधम्म युवा प्रज्ञा मंच, खरकाडा यांच्या वतीने प्रबोधन थियटर्स नागपूकर यांचा "एल्गार निळ्या क्रांतीचा" ह्या समाज प्रबोधनपर भीम- बुद्ध गितांचा कार्यक्रम १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खरकाडाचे माजी सरपंच रविंद्रजी ढोरे तर सह उद्घाटक म्हणून ब्रम्हपुरी किसान काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाजी तुपट उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ताराचंदजी पारधी उपसरपंच खरकाडा, देवचंदजी ठाकरे माजी सरपंच पाचगाव, उत्तमजी बनकर रुई, तुकारामजी ठाकरे माजी उपसरपंच खरकाडा, प्रमोदजी मैंद, प्रमोदजी सोंडवले माजी उपसरपंच मांगली व अन्य मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर म्हणाले की, "ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपले गुरू मानत ते दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी सर्वस्व पणाला लावून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे आदय शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे आजची स्त्री शिक्षण घेऊ शकत आहे. दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. बंधूंनो बाबासाहेबांचे विचार सर्वच क्षेत्रात व्यापलेले आहेत. त्यांचे कार्य सूर्याच्या तेज्यासारखे उजेड, ऊर्जा, बळ आणि प्रेरणा देणारे आहेत. सूर्य कधीच भेदभाव करत नाहीत, तसेच बाबासाहेबांचे कार्य सर्व मानवासाठी आहे. ते कोणी एका विशिष्ट जातीत धर्मासाठी किंवा शहरा- खेड्यातल्या लोकांसाठी नसून तर बाबासाहेबांचे विचार सर्व भारतीयांना प्रेरणा देणारे आहेत. असे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रबोधन थियटर्स नागपूकर यांच्या "एल्गार निळ्या क्रांतीचा" ह्या समाज प्रबोधनपर भीम- बुद्ध गितांनी खरकाडा गावं भिममय झालं होत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने खरकाडावासीय जनता उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतधम्म युवा प्रज्ञा मंच, खरकाडाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.