नागरिक तसेच विद्यार्थी तक्रारीचे निवारण तथा मार्गदर्शन करून महसुली प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतीमान करण्याच्या अनुषंगाने महसूल प्रशासन आपल्या दारी येत असल्याचे प्रतिपादन आरमोरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार हरीदास दोनाडकर यांनी केले ते आरमोरी तालुक्यातील कासवी येथे तहसील कार्यालय आरमोरी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, तरूण, विद्यार्थी व वंचित घटकांना त्यांच्या दैनंदिन कामासाठी विविध प्रश्न व समस्यांच्या निराकरणासाठी महसूल विभागाची कुटंब म्हणून नाते जोडण्याचे काम केले त्यासाठी पारदर्शक व तंत्रस्नेही सेवा ठराविक वेळेत मिळाव्यात यासाठी महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम व योजना राबविल्या जात असल्याचे नायब तहसीलदार धनराज वाकुडकर यांनी सांगितले ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाला पत्रकार प्रविण राहटे, मंडळ अधिकारी चंद्रशेखर नागापुरे, सहाय्यक शिक्षक विवेक धोटे,प्रभु वैद्य, अंगणवाडी सेविका ज्योती कानतोडे आदि उपस्थित होते
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कासवीचे तलाठी रविंद्र तुलावी, तलाठी, शेगावचे तलाठी चंद्रशेखर राखडे,शिवनीचे तलाठी पराते, ग्रामपंचायत कर्मचारी रोशन भोयर यांनी सहकार्य केले.यावेळी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच सातबारा वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन व आभार तलाठी तुलावी यांनी केले.