वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) असे होते. महाराजांचे गुरु परमहंस आडकोजी महाराजांनी माणिक नाव बदलून तुकडोजी हे नाव ठेवले. महाराजांचे राष्ट्रपती भवनात झालेले खंजेरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधित केले तेव्हा पासून महाराजांचे नावासमोर राष्ट्रसंत लावले जाते.
व्दापार युगातील युगप्रवर्तक श्रीकृष्ण गीतेमध्ये महाभारत युद्धाच्या काळात अर्जूनाला दिलेला उपदेश जीवन जगण्याची योग्य दिशा दाखविते. श्रीकृष्णाने मायेच्या बंधनामध्ये अडकलेल्या अर्जूनाला गीता सांगून धर्माचा मार्ग सांगितला. गीतेतील धर्म, कर्म आणि प्रेम यांचा पाठ शिकून घेणे महत्त्वाचे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, स्वधर्म तेव्हाच आचरणात आणला जाऊ शकतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या अंतरंगात कृष्ण आहे हे समजतो.
तसेच आधुनिक युगातील युगप्रवर्तक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या सामान्य जनांना उपदेश करण्यासाठी महाराजांना ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या काठावर मिळाली. श्रीकृष्णाची कृपा झाली. हा खरोखरच पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि भगवंताने त्यांना स्पष्ट आदेशच दिला. म्हणूनच वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमेश्वर स्वरुप आहेत.
पुण्यक्षेत्र पंढरपूरी, बैसलो असता चंद्रभागे तीरी ।
स्फुरु लागली ऐसी, अंतरी विश्वाकार वृत्ती ।।
काहीजण म्हणतील तुकडोजी महाराजांना परमेश्वर स्वरुप (देव) करून कां बसविता. त्यांनी सांगितलेली ग्रामगीतेचा बोध कोण घेईल. या पृथ्वीवर श्रीराम माणूस म्हणूनच जन्माला आलेत, त्यांनी चांगले कर्तव्य केले म्हणून ते देव झाले. तसेच श्रीकृष्ण माणूस म्हणून जन्माला आले. गीतेचा बोध अर्जूनाला केला म्हणून ते देव झालेत. संत तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा मला तो देव माझ्यातच सापडला. मी आणि ईश्वर एकच आहोत. अशी अनुभूती झाली. देवाला पाहायासी गेलो पण देव सापडला नाही.
देव पाहावयासी गेलो ।
तेथे देवची होऊनी ठेलो ।।
कारण देह हे देवाचे मंदिर आहे तर त्यातील आत्मा हा परमेश्वर आहे. देव अंतर्यामी आहे. देव हृदयस्थ आहे. म्हणजे देव हृदयात राहतो.
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ।
जसी ऊसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।।
तसेच माऊली ज्ञानेश्वरांनी गीतेचे प्राकृतात रुपांतर करून लिहले. राष्ट्रसंत फक्त तिसरा वर्ग शिकून शाळा सोडली. तिसरा वर्ग शिकलेल्या तुकडोजी महाराजांना एवढे ज्ञान कसे प्राप्त झाले. त्यांनी गुरुकृपेने, विठ्ठलाचे साक्षीने ग्रामगीता लिहली. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमेश्वर स्वरुप आहेत. महाराजांनी अवताराचे कार्य करण्याकरिताच मानव जन्म घेतला. प्रत्येक व्यक्ती हा अवताराचे कार्य करण्यासाठी जन्माला येत असतो. महाराज म्हणतात.
अवताराचे कार्य कराया ।
वेळची अजुनी उरला कां ।।
प्रत्येक जीव हा ईश्वराचा अंश आहे. जेवढा आपला विकास घडवून आणाल तेवढे चांगलेच आहे. चांगले कार्य केले तर व्यक्ती उच्च पदावर जात असतो. हे आपले अवताराचेच तर कार्य आहे. याच लोकी आपणास ईश्वरासारखे बनायला हवे. तुकडोजी महाराज म्हणतात.
जीव ईश्वराचा अंश ।
जितुका करी आपुला विकास ।
तितुका उच्च अवतार पदास ।
याच लोकी जातसे ।।
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विदर्भात संचार असला तरी सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नाहीतर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. भारत छोडो १९४२ च्या आंदोलनात त्यांना काही काळ अटक झाली होती. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अंदश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा प्रभावीपणे वापर केला. ग्रामगीते सोबतच त्यांनी आनंदामृत, आत्मप्रभाव ग्रंथ तसेच लहर की बरखा, हिंदी मराठी भजने व अभंग लिहले. म्हणूनच मला म्हणायचे आहे की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमेश्वर स्वरुप आहेत.
भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी त्यांची श्रद्धा होती. महिलोन्नती हा तुकडोजी महाराजांचा विचार विश्वाचा एक लक्षणिय पैलू होता. कुटूंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राष्ट्र व्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनातून, भजनाद्वारे पटवून दिले. खरोखरच राष्ट्रसंत परमेश्वर स्वरुप आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "सेवामय जीवन हाच खरा धर्म आणि सत्यमय सेवा हीच खरी भक्ती" धर्म म्हणजे समाजधारणेची योजना आहे. असे सांगून "खरा मानव धर्म" जगात नांदावा, विश्वबंधुत्वाची कल्पना रुजावी. अशी खटपट करणारे राष्ट्रसंत होते. भजना सोबतच संघटनेचा मंत्र दिला. सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व जनमाणसावर बिंबवले. म्हणूनच राष्ट्रसंत परमेश्वर स्वरुप आहेत.
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा ।
झटू सर्वभावे करु स्वर्ग गांवा ।
कळो हे वळो, देह कार्यी पडू दे ।
घडू दे प्रभो, एवढे हे घडू दे ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बाल वयातच चिमूर भागात जंगलात ध्यान साधना करण्याकरिता फिरत असताना एका झाडाखाली बसले होते. एक वाघीण तीन पिलांना घेऊन येत होती. महाराज वाघीणीला म्हणाले, थांब रे मोहन. वाघीण थांबली. तुकडोजी महाराज यांनी वाघीणीचे दुध दोन टोकर काढले. तसेच नेरी येथील महादेव मंदिरात महाराजांना विष दिले होते. त्यातून ते सुखरुप वाचले. ही घटना सुदामदादा सावरकर यांच्या जीवनयोगी ग्रंथातील आहे. म्हणूनच महाराज परमेश्वर स्वरुप आहेत. याला कृपया चमत्कार कुणीही मानू नये. ही अचानक घडलेली घटना आहे. जादूटोणा, मंत्रतंत्र, चमत्कार, गंडा, ताईत यावर लोक वेड्यासारखे विश्वास ठेवतात. महाराज म्हणतात.
भुलू नका हो चमत्कारा ।
जगी ही थापची सारी ।।
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परमेश्वर स्वरुप असले तरी विश्वाचा सांभाळ करणाऱ्या प्रभूला ते मागणी घालतात. महाराज सर्व देशात, सर्व वेषांत ईश्वराला पाहतात. सर्व ठिकाणी ईश्वर आहे. त्याची नावे अनेक असली तरी तो एकच आहे.
ऐ विश्वके चालक प्रभू ।
मुझमें समझ दे विश्वकी ।।
तसेच
हर देशमें तू, हर भेषमें तू ।
तेरे नाम अनेक, तू एकही है ।।
बोधः- सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांमध्ये, सर्व मानवामध्ये ईश्वराचा अंश असतो. म्हणून आपल्याला ईश्वरासारखे वागायला हवे. परमेश्वराचे किंवा ईश्वराने सांगितलेल्या गीतेचे, ज्ञानेश्वरीचे तसेच ग्रामगीतेचे वाचन करुन त्याप्रमाणे अनुकरण करुन या सृष्टीला स्वर्गमय बनवू या.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर,
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....