पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ।
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु।।९।।
बीजं मां सर्वभूतांनां विद्धि पार्थ सनातनम्।
बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्।।१०।।
एक मुलगा होता.त्याच्या आजीने त्याच्यावर 'सर्वत्र परमेश्वर आहे.' हे ठसवलं होतं. एकदा शाळेत त्याला गुरुजी बोलले,"बाळा, मला तू हे सांग,की परमेश्वर कोठे कोठे आहे? मी तुला एक चॉकलेट बक्षीस देतो!"
तेव्हा तो छोटासा मुलगा उत्तरला, "गुरुजी मीच तुम्हाला दोन चॉकलेट्स बक्षीस देईन.मला फक्त परमेश्वर कुठे कुठे नाही,ते सांगा!"
त्या छोट्याश्या मुलाला आजीने सोप्या पद्धतीने अध्यात्म शिकवलं होतं.परमेश्वर सर्वत्र आहे, कणाकणांना व्यापून उरला आहे. म्हणून गीतेच्या सातव्या अध्यायाच्या नवव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात, "पृथ्वीवरचा सुंदर सुगंध मीच आहे. अग्नीचे तेज म्हणजे मी आहे. सर्व प्राणीमात्रांचे जीवन म्हणजे मी (परमात्मा)च आहे. आणि तपस्वी लोकांचे तप म्हणजे मी आहे.हे पार्थ, सर्व प्राणिमात्र निर्माण होतात, ते बीज मी आहे.बुद्धिमानांची बुद्धी मी आहे.आणि तेजस्वी लोकांचे तेज मी आहे!
थोडक्यात या जगातल्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी परमेश्वर आहे.या जगात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि अंत परमेश्वरात होतो. मधल्या काळात त्या गोष्टी दिसतात,त्या गोष्टींमध्ये जीवन दिसते,ती शक्तीसुद्धा परमेश्वराचीअसते. हेच आपल्याला जाणून घ्यायचे आहे.म्हणजे जीवनातल्या कुठल्याही गोष्टी घडत असताना आपल्या पाठीवर परमेश्वराचा खंबीर हात असलेला पदोपदी जाणवतो!
जय श्री कृष्ण!
लेखक:- श्रीनिवास राघवेंद्र जोशी, कारंजा,जि.वाशीम
आपल्या प्रतिक्रिया द्या....