वेंगुर्ला नगरपरिषद परिसरात तब्बल पन्नासहून अधिक मंदिरं आहेत. वेंगुर्ला शहराच्या बाजारपेठ रस्त्याला लागून कुबलवाडा नावाचा एक भाग आहे. या कुबलवाडा भागात कृष्णवर्णीय अर्थात काळ्या पाषाणातील एकमुखी श्री गुरु दत्तात्रेयांचा ७०० वर्षांपूर्वीचं फ़ार प्राचीन असं स्थान आहे. इथल्या दत्तमूर्तीला ‘काळा दत्त’ असं प्रचलित नाव आहे.
कुबलवाडा भागात पूर्वी श्री गावसकर नावाचे एक सद्गृहस्थ रहात होते. ते दत्तभक्त होते. एकदा ते श्री क्षेत्र नृसिंहवाडीला श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला गेले होते. कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर स्नान करीत असताना त्यांच्या पायाला एक पाषाण लागला. त्यांनी तो उचलला असता ती काळ्या पाषाणाची दत्त मूर्ती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ती मूर्ती काढली आणि वर आणून ठेवली. वाडीत ते दोन-तीन दिवस मुक्कामाला होते. दुसऱ्या रात्री त्यांना स्वप्न दृष्टांतात “ही मूर्ती तुझ्या गावी घेऊन जा आणि स्थापना कर” असा आदेश झाला. त्यानुसार ते ती मूर्ती वेंगुर्ल्यात घेऊन आले. आता या मूर्तीची स्थापना कुठे आणि कशी करायची असा प्रश्न त्यांना पडला. गावातील सावकार आणि उच्चभ्रू व्यक्तींना नृसिंहवाडीत घडलेला सगळा प्रकार त्यांनी सांगितला. तेव्हा वेंगुर्ला येथील श्री कुबल यांनी श्री दत्त मूर्तीच्या स्थापनेसाठी आपली जमीन देऊ केली. स्थानिक सावकार श्री गुरये यांनी नुकतीच वायंगणी गावातील त्यांची जमीन चार पैशाला विकली होती. त्या रकमेपैकी त्यांनी तीन पैशांतून श्री दत्त मूर्तीसाठी घुमटी गाभारा बांधून दिली आणि उर्वरित एक पैशातून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करवून दिली. अशा प्रकारे नृसिंहवाडीत मिळालेली स्वयंभू दत्त मूर्ती शेकडो मैल दूर वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी स्थापित झाली.
त्यानंतर अशीच काही वर्षे लोटली. वेंगुर्ल्यात श्री रघुनाथ कामत-आरोसकर नामक एक वृध्द दत्तभक्त होते. त्यांच्या घरी पूजेत एकमुखी षडभूज अशी एक पंचधातूची दत्तमूर्ती होती. वृध्दावस्थेमुळे त्यांना सोवळं-ओवळं, देवाची नियमित पूजाअर्चा करणं काही जमेना. त्यामुळे, नित्य सेवेच्या ठिकाणी ही दत्तमूर्ती द्यावी अशी त्यांची इच्छा होती. कुणीतरी त्यांना कुबलवाड्यातील दत्त मंदिराचं स्थान सुचवलं. त्याप्रमाणे ते मूर्ती घेऊन मंदिरात आले असता त्यांच्याकडील पंचधातूची मूर्ती ही मंदिरातील स्वयंभू दत्तमूर्तीचीच प्रतिकृती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि सगळे थक्कच झाले. हा योगायोग म्हणावा की महाराजांची लिला?
या मंदिराचा परिसर बऱ्यापैकी मोठा आहे. मुख्य रस्त्यापासून थोड आत असल्याने अतिशय शांत वाटतं इथे. या मंदिराचं उंच छत, रंगीत काचांची तावदानं आणि चेकर्ड फ़रशी यामुळे या वास्तुची रचना गॉथिक पध्दतीची वाटते. दत्त महाराजांची कृष्णवर्णी पाषाणातील मूर्ती अतिशय रेखीव आहे. मला तर या मूर्तीकडे पाहताक्षणी पंढरपूरचा विठूरायाच आठवला. अंगावर केवळ कौपिन वस्त्र, सहा हातांपैकी खालील दोन हातांमध्ये गदा आणि कमंडलू, मधल्या दोन हातांमध्ये त्रिशूळ आणि डमरु आणि वरच्या दोन हातात शंख आणि चक्र ही आयुधं व चिन्हं आहेत. एकमुखी असल्याने श्रीपाद श्रीवल्लभ या श्री गुरु दत्तात्रेयांच्या आद्य अवताराची ही मूर्ती असल्याचं तिथे मानलं जातं.
या मंदिरात दर गुरुवारी रात्री ८ वाजता पालखी सेवा असते. श्री दत्त जयंतीचा ९ दिवसांचा उत्सव असतो. गुरुद्वादशीचा उत्सव ७ दिवसांचा असतो. या व्यतिरिक्त श्रीमन नृसिंहसरस्वती स्वामी महाराज जयंती, गुरु प्रतिपदा, माघ पोर्णिमा, होळी पोर्णिमा, गुढ़ी पाडवा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी दत्त महाराज जयंती या दिन विशेषांना सुध्दा या मंदिरात उत्सव असतो.