पातूर (Akola):- पातूर पोलीस ठाण्याअंतर्गत रविवारी दोन अल्पवयीन मुलींचा वेगवेगळ्या घटनेत विनयभंग (disobedience) झाल्याने पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. या मजनूंना वठणीवर आणण्यासाठी जिल्ह्यात मोठा गाजावाजा करून दामिनी पथक कार्यान्वित करण्यात आले होते. मात्र हे पथक सपशेल अपयशी ठरल्याचे जाणवत आहे.
अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
शनिवारी पातूर शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिला शेत काम करण्यासाठी घरून निघून गेली. तिची १२ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून दुपारी २ वाजताच्या सुमारास एका ४० वर्षीय भामट्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला. पाणी पिल्यानंतर इलेक्ट्रिक खांब उभारण्याचे काम करणारा बार्शिटाकळी तालुक्यातील अजनी खुर्द येथील उमेश वासुदेव प्रधान या नराधमाची वासना जागृत झाली. त्याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सदर चिमुकलीची समवयस्कर मैत्रीण घरात असल्याने व दोघींनी आरडाओरड केल्याने संभाव्य अनर्थ टळला. सायंकाळी आई घरी आल्यानंतर तिने आपबिती कथन केली. यासंदर्भात महिलेच्या तक्रारीवरून उमेश प्रधान याच्याविरुद्ध विनयभंग व पोस्कोच्या (POSCO)इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळकरी मुलीवर रविवारी बळजबरी करण्याचा प्रयत्न
तर दुसरी घटना पातूर शहरातच घडली असून, एका आरामशीनवर काम करणारा मोमीनपुर्यातील रहिवासी सय्यद इर्शाद सय्यद तैसर या नराधमाने इयत्ता दहावीत शिक्षण घेणार्या १६ वर्षीय मुलीचा पाठलाग सुरू केला होता. ती शिकवणी वर्गाला जात असताना तिच्या मागे जाणे, अश्लील (obscene) हातवारे करून आपल्या मोहजाळात अडकविण्याचे त्याने शर्तीचे प्रयत्न केले. मात्र त्याच्या या प्रयत्नाला भीक न घालणार्या शाळकरी मुलीवर रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सय्यद इर्शादने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी मुलींची छळ काढणे, त्यांचा विनयभंग करणे इतपत मजल या मजनूची जात आहे. त्यांना पोलीस न्यायव्यवस्था यांची कु’लीही भीती नसल्याचे जाणवत आहे. यासंदर्भातही पातूर पोलिसांनी विनयभंग व पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे. ठाणेदार किशोर शेळके व त्यांची चमू पुढील तपास करीत आहे.