ज्या घरातील स्त्री ईश्वर तसेच तुळशीची पूजा करते. दररोज देवाजवळ व तुळशीजवळ दिवा लावते. स्वयंपाक झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून नंतर भोजन करतात. यामुळे घरातील वातावरणात राहणारे कुटुंब सुखी, आनंदी असतात.
ज्या घरातील स्त्री लहान सहान गोष्टीवर समाधान मानते, जास्त लोभ करीत नाही, तिचा पती देखील तिच्यावर आनंदी असतो. उदाः- काही स्त्रीया जर शेजारी काही नविन वस्तू आली की, आपल्या घरात ती वस्तू यायलाच हवी म्हणून पतीला मागणी पूर्ण करण्याकरिता नाकीनव आणतात. या मागण्या पूर्ण करण्याकरिता पतीला कठीण व वाईट कामे देखील करावी लागतात व त्याचा वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. म्हणून जर स्त्री समाधानी असेल व तिच्या गरजा कमी असतील तर त्या पूर्ण करताना पतीला देखील जास्त कष्ट कराव लागत नाही व घरातील वातावरण आनंदी, समाधानी राहते.
स्त्री मध्ये धैर्य, धाडस असावे. कोणतीही परिस्थिती असली तर न डगमगता त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद स्त्री मध्ये असावी. कितीही वाईट परिस्थिती आली तरी स्त्री ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असायला हवी. धैर्यवान, जबाबदार, धाडसी स्त्री घरामध्ये असेल तर वाईट परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही.
राग येणे हा स्त्रीचा जन्मजात स्वभाव आहे, परंतु अति राग करणे, चिडचिड करणे, कर्कश आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्री मध्ये असू नयेत. थोडाफार राग सर्वच स्त्रीयांना येतो व तो यायलाच हवा. त्या रागाचा कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो व वाईट परिणाम होऊ शकतात. स्त्रीच्या रागामुळे घरातील शांतता निघून जाते. भांडणे व वादविवाद होत राहतात म्हणून स्त्रीने सयंमित व शांत असायला हवे.
ज्या घरातील स्त्री कोणत्याही गोष्टीत समजदार पणाने घेते, शांततेने सर्व समजून घेते, शांतपणे विचार करून सर्वांशी चांगले वागते, गोड बोलते. त्यामुळे ते घर देखील सुखी व आनंदी असते. स्त्री सदैव गोड बोलत असेल तर सर्व लोक तिच्या कुटुंबासाठी धावून येत असतात.
आई हे फक्त नाते नाही . ते एक आद्य विद्यापीठ आहे. जन्माला आल्यापासून आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आईच्या कृतीतून, आठवणीतून अनेकदा मार्ग सापडत असतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात.
जिच्या हाती पाळण्याची दोरी ।
तिच जगाते उद्धारी ।
ऐसी वर्णिली मातेची थोरी ।
शेकडो गुरुहुनिही ।।
महाराज म्हणतात की, "जिच्या हाती पाळण्याची दोरी" म्हणजे "आई, तीच जगाचा उद्धार" करु शकते. तीच शंभर गुरुपेक्षाही महान आहे. आईची महती वर्णावी तेवढी कमीच आहे. आईचे जन्म दिलेलं प्रत्येक मूल हा तिचा काळजाचा तुकडा असतो. तिचा हा काळजाचा तुकडा जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असावा असे प्रत्येक आईला वाटत असते. अगदी लहान वयातच त्या बाळावर आईकडून चांगले संस्कार झाले तरच ते बाळ जगाचे कल्याण करु शकते.
ज्या मातेचे पूत्र जनकल्याणासाठी झिजले, ज्यांच्या कतृत्वाने ही पृथ्वी धन्य झाली. अशा सर्व पुत्राच्या मातांना ग्रंथामध्ये अजरामर स्थान आहे. प्रल्हादाची कयाधू आई, शुरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ, जिजाऊच्या मार्गदर्शनाने स्वराज्य निर्माण झाले. कौसल्या व देवकी ह्यांची प्रचिती इतिहासाने करून दिलीच आहे. प्रत्येक घरादारात नवचैतन्य जागं करणारी ही स्त्री माताच असते. ग्रामगीतेत राष्ट्रसंत म्हणतात.
स्त्री पुरुष ही दोन चाके ।
परस्पर पोषक होता निके ।
गाव नांदेल स्वर्गिय सुखे ।
तुकड्या म्हणे ।।
संसाराच्या गाडीचे स्त्री व पुरुष ही दोन चाके आहे. त्यातले एक जरी चाक कमी किंवा कमजोर असलं तर गाडी पुढे जाणार नाही. स्त्रीचा सन्मान जर केला तर समाजाची प्रगती होऊन मुले मुली संस्कारीत करण्यात आईवडिल महत्त्वाचे घटक आहे. आईवडील यांनी मुलामुलींची नावे रीटा, पिंकी, बंटी, पिंटू असे ठेवू नये. अशा नावाचा परिणाम मानवाचे मन, व्यवहार आणि जीवनावर होतो. मुलामुलींची नावे चांगले ठेवली तर त्या नावाचा चांगला परिणाम मुलांवर दिसून येतो.
स्त्रीने गरोदर असताना नामजप केल्याने प्रसुतीच्या वेळी त्रास न होता पोटच्या बालकावर नामजपाचा उत्तम संस्कार होते. मुले जन्माला येण्यापूर्वी गर्भावर उत्तम संस्कार होण्यासाठी संतांचे आध्यात्मिक ग्रंथ वाचावीत. संतांची, देवाची चरित्रे वाचली पाहिजेत. देवतेचे, संतांचे, वीर पुरुषाचे चित्र स्त्रीने बघावे वा त्यावर ध्यान करावे. आईचा आहार, विहार, विचार व इच्छा यांचा गर्भावर परिणाम होतो. असे करण्यामुळे पोटच्या मुलावर त्याचा उत्तम संस्कार घडून येत असते. ज्या घरात सुसंस्कृत स्त्रीया असतील तर तिथे उत्तम संस्कार होतात. तेथील मुले सुद्धा संस्कारक्षम बनतात. आईवडील यांनी आपली मुले व मुली गुरुदेव सेवा मंडळाचे संस्कार शिबिरामध्ये पाठवावीत, जेणेकरुन मुले, मुली संस्कारीत होतील. समाजात आदर्श मुले निर्माण होतील. जयगुरु !
लेखक-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....