परभणी:- शहरातील जिंतूर रोड परिसरातील श्रीप्रल्हाद राम मंदिर महालक्ष्मी नगरात श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीसद्गगुरु प्रल्हाद महाराज काळे(रामदासी) यांचे जीवनचरित्रावर आधारीत दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे.
शहरातील महालक्ष्मी नगरातील श्रीप्रल्हाद राम मंदिराच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने गोविंद रामानंद समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज (रामदासी)संस्थान साखरखेर्डा प्रस्तुत रंगबावरा नागपुर निर्मित एक तत्व नाम या प.पु.प्रल्हाद महाराज यांचे जीवनावर आधारीत सौ.अधिश्री देशपांडे,(नागपुर ) लिखित, दिग्दर्शित दोन अंकी नाटकाचा प्रयोग १८फेब्रुवारीला सायंकाळी ६.००वा.श्री प्रल्हाद राम मंदिर परिसरात होणार आहे.
या नाटकास आमदार डॉ.राहुल पाटील,भागवताचार्य बाळु महाराज असोलेकर,वेदांत कोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी,वे.मू.प्रभाकरराव नित्रुडकर गुरु यांची उपस्थिती लाभणार आहे.
श्रीक्षेत्र येहळेगांव येथील तुकाई महाराज,गोंदवले येथील ब्रह्मचैतन्य महाराज,जालना कर्मभूमी असणारे रामानंद महाराज अशी रामदासी गुरुपरंपरा लाभलेल्या श्रीप्रल्हाद महाराजांचे शिष्य केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात व परदेशातही आहेत.आयुष्यभर रामनामाचा प्रसार व प्रचार करणाऱ्या या सत्पुरुषाचा जीवन पट भाविकांसमोर या नाट्यकृतीतून मांडला जाणार आहे. तरी सर्व सद्गुरु भक्तांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीप्रल्हाद महाराज उपासना मंडळ व प्रल्हाद राम मंदिराचे विश्वस्त मंडळाचे वतीने करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी उपासक मंडळासह विकासगुरु तळणीकर, भास्कर कुंडीकर,केशव सातोनकर,नरेंद्र देशपांडे, सतिश कोठीकर,आनंद कुंडीकर,संजय जोशी परिश्रम घेत आहेत.