वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. संजय देशमुख साहेब यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मा.ना.अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील दीर्घकालीन प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत चर्चा केली.याही आधी खा.संजय देशमुख साहेब यांनी या विषयाला घेऊन संबंधित विषयाबाबत चर्चा केली होती. सदर विषयाचा पाठपुरावा करत परत त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली.
खासदार देशमुख यांची सातत्याने मुर्तिजापूर–कारंजा–दारव्हा या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठीची मागणी होती. या मार्गाचे DPR देखील बनवायचे काम त्यांनी पाठपुरावा करून सुरू करून घेतले. या सुरू असलेल्या DPR (Detailed Project Report) बद्दल यावेळेस चर्चा केली. हा DPR अंतिम टप्प्यात आला असून, पूर्ण होताच तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. या मार्गावर एकेकाळी चालणारी ‘शकुंतला एक्सप्रेस’ पुन्हा धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
*नांदेड व्हाया वाशिम–मुंबई रेल्वे लवकरच सुरू करण्याची मागणी !*
ट्रेन क्र. 17665/66 आणि 17667/68 (नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस) ही रेल्वे वाशिम मार्गे मुंबईसाठी मंजूर असूनही अद्याप सुरू झालेली नाही. खासदार देशमुख यांनी ही ट्रेन तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती काल झालेल्या बैठकीत रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री.सतीश कुमार जी यांनी ही ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.आता वाशिम जिल्ह्याला प्रथमच मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे मिळणार आहे, वाशिम जिल्ह्यातील जनतेचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
तसेच यावेळी खासदार संजय देशमुख यांनी वर्धा–यवतमाळ -नांदेड या रेल्वे मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याची गंभीर बाब चेअरमन यांच्या निदर्शनास आणून दिली. हा लोहमार्ग यवतमाळ जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या कामास गती देणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. रेल्वे बोर्डाने या मार्गाचे सघन निरीक्षण करून काम वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी,अशी विनंती त्यांनी केली.असे वृत्त त्यांच्या कार्यालयाकडून मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.