ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, संपादक, सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे माजी सचिव, सर्वोदय शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष, भाषाप्रभू मदनराव उपाख्य पुरुषोत्तम हरिभाऊ धनकर (Madan Dhankar) यांचे रविवार, 30 जुलै रोजी दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंड व बराच मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार, 31 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता त्यांच्या विद्यानगर, चंद्रपूर येथील राहत्या घरुन निघेल.
चंद्रपूरच्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य फार मोठे आहे. येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पालखी त्यांनी वाहिली होती. त्यांच्या नेतृत्वात हे संमेलन यशस्वीरित्या पार पडले. शांताराम पोटदुखे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी येथील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्राला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला.
मान्यवरांच्या शोकसंवेदना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. विजय वडेट्टीवार, माजी खासदार नरेश पुगलिया, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. (Madan Dhankar) मदनराव धनकर म्हणजे चंद्रपूरच्या साहित्य क्षेत्रातील चालते बोलते ज्ञानकोष होते. त्यांच्या दुःखद निधनाने आज चंद्रपूरच नव्हे तर विदर्भातील एक अनमोल असे साहित्य रत्न हरपले आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी शोक संवेदना व्यक्त केली आहे.