गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे पोलिस विभागाकडून प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मंडळाच्या बैठका घेणे सुरू आहे. यात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाने खरे कान-नाक-डोळे आहेत, असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, ईद ची मिरवणूक ही सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तर गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दुपारी 3 नंतर काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर याबाबत मंडळनिहाय चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचा सामाजिक एकोपा अतिशय घट्ट आहे. तरीसुध्दा बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यात किंवा इतर ठिकाणी काही अघटीत घडल्यास त्याची प्रतिक्रिया चंद्रपुरात उमटू देऊ नका, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.