कारंजा : राज्याच्या हवामान खात्याचे अंदाज सपशेल चुकीचे ठरवीत निसर्गाने पावसाची हुलकावणी दिली असून,मृगातच पेरणी करण्याच्या अट्टाहासाने शेतकऱ्यांनी पहिल्या पावसा नंतरच पेरण्या उरकून घेतल्या होत्या. जून महिन्यात सरासरी एवढा पाऊस पडेल असा राज्याच्या हवामान खात्याचा अंदाज होता.परंतु आकाशात ढग धावून येतात.रिमझिम पाऊसाच्या सरीही येतात. मात्र जमिनीची झिज भरून काढणारा पाऊस नसल्याने शेतकरी चिंताक्रांत असून,आकाशाकडे आशेने पहात आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असणाऱ्या निवडक शेतकऱ्यांनी भर पावसाळ्यात स्प्रिंकलरने पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. जून महिना उलटूनही समाधानकारक पाऊसच झाला नसल्याने वातावरणातील उष्णता व उकाडा कमी न झाल्याने,ए सी व कुलर वापरावे लागत आहेत. शिवाय साथीचे रोग डायरीया, डेंग्यु,मलेरिया,टायफाईड आजाराने डोके वर काढल्याने रुग्नालयात रुग्नांची गर्दी वाढत आहे.