कारंजा - समाजकार्य, पत्रकारीता आणि गोंधळी लोककलेच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करणारे दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शनिवार, २७ जुलैला सायंकाळी श्री कामाक्षा देवी संस्थानच्या सभागृहात राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य व प्रबोधनकार संतोष महाराज सोनोने यांच्या गोंधळ गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही दिव्यांग जनसेवक संजय कडोळे हे गेल्या ४० वर्षापासून समाजसेवा करीत आहेत. निराधारांना शासनाकडून मानधन व वृध्द कलावंतांना मदत मिळण्यासाठी कडोळे यांनी लोककलावंत संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा उभारला होता. त्याचेच फळ म्हणून अनेक वृध्द व निराधार कलावंतांना शासनाकडून मानधन मिळत आहे. त्यामुळे या व्रतस्थ सेवाव्रतीचा वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती पुरस्कार देवून सन्मानित केले आहे. याशिवाय अनेक संस्था, संघटनांनी त्यांचा विविध पुरस्कार देवून गौरव केला आहे. त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला त्यांचे चाहते, मित्रपरिवार व कलावंत मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श जय भारत बहुउद्देशिय संस्था, ईरो फिल्मस एन्टरटेरमेंट, कारंजा पत्रकार मंच, विदर्भ लोककलावंत संघटना, करंजमहात्म्य परिवार, आई कामाक्षा मित्र मंडळ कारंजा यांच्यासह माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने, डॉ. इम्तियाज लुलानिया आदींनी केले आहे.