महानगराला लागून असलेल्या दुर्गापूर येथे मंगळवारी (दि.10 मे) रोजी रात्री नऊच्या सुमारास 3 वर्षाची चिमुकली अंगणात खेळत असताना बिबट्याने तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, यावेळी चिमुकलीच्या आईन हातात काठी घेऊन बिबट्याला पिठाळून लावले. या घटनेनंतर संतापलेल्या दुर्गापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी आलेले वनपरिक्षेत्राधिकारी यांचेसह 10 जणांना घेराव घालून बंदीवासात टाकले. तब्बल पाच तासानंतर मुख्य वनसंरक्षकांनी दुर्गापूर परिसरात मुक्तसंचार करणाऱ्या त्या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश दिल्याने नागरिकांनी वनपरिक्षेत्राधिऱ्यासह दहा क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची बंदीवासातून मुक्तता केली.
अनेक महिन्यांपासून दुर्गापूर व उर्जानगर परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. गावात, घरात तसेच अंगणात व शेजारी येवून नागरिकांचा बळी घेतलेला आहे. विशेष म्हणजे काही लहान मुले नरभक्षक बिबट्याची शिकार झाले आहेत. मंगळवारी (दि.10 मे) रोजी रात्री नऊच्या सुमारास चंद्रपूर महानगराला लागून असलेल्या दुर्गापूर येथे वार्ड क्रमांक एक मध्ये जगजीवन पोप्पलवार यांची तीन वर्षातची मुलगी आराक्षा ही अंगणात खेळत होती. दरम्यान, घराशेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंगणातून चिमुकलीला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, यावेळी घरी काम करत असलेल्या चिमुकलीच्या आईने धावून हातात काठी घेऊन बिबट्याला पिठाळून लावल्याने तिचा जीव वाचला. मात्र यात ती जखमी झाली. त्यानंतर तिला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.
या घटनेची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकार यांना मिळाली असता ते दहा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी त्यांनी बिबट्याची शोधाशोध केली, परंतु त्यापूर्वीच बिबट्याने पळ काढला होता.
मात्र या घटनेनंतर दुर्गापूर येथे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याने नारिकांनी वनपरिक्षेत्राधिकारी यांचेसह दहा कर्मचाऱ्यांना घेराव घातला. घेरावाच्या बंदीवासात ठेवून दुर्गापूर परिसरात मुक्तसंचार करीत असलेल्या नरभक्षक बिबट्याचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी लावून धरण्यात आली.
काही दिवसापूर्वी याच परिसरातून एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाल यश आले होते. त्यानंतर नागरिकांनी बिबट्या जेरबंद झाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. परंतु पुन्हा घरातील अंगणात असलेल्या एका महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जागीच ठार केले होते. मुख्य वनसंरक्षका कार्यालयासमोर मृतदेह ठेवूनबिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी त्या वेळी करण्यात आली होती.