तालुक्यातील अवैध दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मोझरी शेतशिवारात गाव संघटनेच्या सदस्यांसह मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृती करीत २० हजार रुपये किमतीचा चार पोती मोहफुलाचा सडवा शुक्रवारी नष्ट केला. मोहझरी गावात हातभट्टीवर दारु गाळून सोबतच बाजूच्या गावांतील किरकोळ विक्रेत्यांना दारू पुरवठा केला जाते. या गावात दारू पिण्यासाठी परिसरातील नगरी, काटली, साखरा, बसा, पोर्ला, नवरगाव येथील मद्यपी येत असतात. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. अशातच शेतशिवारात येथील दारूविक्रेत्यांनी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबवून जवळपास चार पोते मोहफुलांचा सडवा नष्ट केला.