कारंजा : दिवाळी दिपोत्सव हा केवळ अवाजवी उधळण करण्याचा सण नसून,दिवाळी म्हणजे आपल्या भारतिय संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. म्हणूनच दिवाळी मध्ये आपण स्वतः स्वतःचे कुटुंबाला जेवढं आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तेवढच आपण आपल्या सभोवती असणाऱ्या,समाजातील गोरगरीब,अनाथ,दिव्यांग,दुर्धर आजारग्रस्त, तळागाळातील,दारिद्रय रेषेखालील,घराशेजारील गरजूं लोकांना सुद्धा आनंदी ठेवण्याचा अल्पसा जरी प्रयत्न करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण दिवाळी साजरी केली याचा परमानंद आपणास उपभोगता येईल. व त्यामुळे साहजीकच आपल्या हातून केवळ "पुण्यकर्म"नव्हे तर "महापुण्य"होईल.दिवाळी सणाला कितीतरी व्यक्ती कित्येक हजारो रुपयाची महागडी फटाके फोडतात.वाजवीपेक्षा खर्च करून हजारो लाखो रुपयाचा खर्च दिवाळी सणाला केला जातो. ज्याचा पैसा तो व्यक्ती निश्चितच त्याला हवा तसा खर्च करू शकतो.कारण हा पैसा त्या व्यक्तीचा स्वतःचा असल्यामुळे तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे खर्च करणाऱ्या व्यक्तीला साहाजिकच कुणीही अडवू शकत नाही किंवा बंधन टाकू शकत नाही. श्रीमंताच्याच नव्हे तर कित्येक वेळा मध्यमवर्गीयांच्याही, कित्येक घरी हवे तेवढे कपडे घरात असतांना नविन कपडे खरेदी केले जातात.त्यामुळे जुने कपडे अडगळीत पडतात.दिवाळीत कितीतरी वेगवेगळे फराळाचे, मिष्ठान्न,खाद्यपदार्थ,अन्नपदार्थ केले जातात.बऱ्याच वेळी खाणाऱ्या व्यक्ती मिळत नसल्याने हे अन्नपदार्थ वायाव्यर्थ जातात. अशावेळी जर प्रत्येक सशक्त व्यक्तीने आपल्या सभोवती असणाऱ्या गरजू,गोरगरीब,अनाथ,निराधार वक्तीचे भान ठेवले.त्यांचे करीता देखील आपले काहीतरी कर्तव्य आहे याची जाणीव ठेवली.व अशा व्यक्ती करीता काहीतरी मदत करण्याची भावना ठेवून, त्यांची दिपावली गोड करण्याची इच्छाशक्ती बाळगून,त्यांना आपणाकडील फराळाचे अन्नपदार्थ,आपल्याकडील कपडे, व अडगडीतील आपणाकडील वस्तू त्यांना दिल्या तर निश्चितच खऱ्या अर्थाने आपल्या हातून महापुण्य होऊन त्यांनाही आपण आपल्या आनंदात सहभागी करून घेत त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलवील्याचे समाधान मिळू शकेल व आपली दिवाळी आपण परमार्थाने साजरी करू शकू. त्यामुळे कर्मयोगी संत गाडगे बाबांची दशसुत्री लक्षात घेऊन, भुकेल्याला अन्न,उघड्या नागड्याला कपडे, निराधाराला आधार, लंगडयापांगळ्याला काठी-कुबडया-वॉकर अशा वस्तू देऊन जर आपण "गरजूंची -दिवाळी"साजरी केली तर आपली दिवाळी संस्मरणिय आनंदाची होऊन आपल्या हातून मानवसेवा होईल.असे मत दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामधून व्यक्त केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 210