आषाढी एकादशीला दरवर्षी संबंध महाराष्ट्रात गावागावातून पालखी सोहळा व विठ्ठलाची वारी ही पंढरपूरच्या देवस्थानात रवाना होत असते. मात्र नवखळा-नागभीड गावातून अशी पालखी कुठेही पंढरपूरला रवाना होत नाही. ही बाब लक्षात घेत संताजी भजन मंडळ नवखळाचे संयोजक श्रीकृष्ण देव्हारी यांचे संकल्पनेतून नागभीड मध्ये पहिल्यांदाच *संताजी ची वारी विठ्ठलाच्या द्वारी* हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
संताजी भजन मंडळातील सर्व मंडळी तथा ताई तेलीन महिला बचत गटातील महिला मंडळी, बलराम शेतकरी बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने व समस्त गावकरी यांचे सहभागाने नवखळा येथील महादेव मंदिरातून संताजी जगनाडे महाराज यांची पालखी व तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पायी दिंडी वारी नागभीड येथील विठ्ठल-रूख्मिनी मंदिर देवस्थानात प्रथमताच काढण्यात आली. यात नवखळा वासीयांनी अगदी सुरेल भजनाद्वारा ही वारी संपन्न केली.
या वारीला सहकार्य म्हणून विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मा.गणेशभाऊ तर्वेकर माजी उपनगराध्यक्ष यांनी मोलाचे सहकार्य केले. हरिश्चंद्र मेहर सर, विनायक चिलबुले, मा. येसनसुरे सर, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष गिरीपुंजेजी, नंदाताई गिरीपुंजे, श्री संजय येरणे, तथा अनेक लोकांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर मध्ये वारी प्रवेश होऊन विधीवत श्रद्धेने पूजा करीत विठ्ठलचरणी भक्तीभाव अर्पण करण्यात आले. या प्रसंगी गणेश भाऊ तर्वेकर यांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले व त्यांनी ही वारी इथून पुढे पंढरपूरला नेण्याचा प्रघात सुरू करण्याचे आश्वासनही दिले. वारीचे समारोपिय कार्यक्रमाचे संचलन संजय येरणे सर यांनी केले.
विठ्ठल मंदिर देवस्थान मध्ये आज दीडशे वर्षेहून अधिक कालावधी झालेला असून सुरू केलेली ही पहिलीच वारी होय. संताजी तेली समाज मंडळ नवखळा दरवर्षी विविध उपक्रम राबवित असते त्यातीलच "संताजीची वारी- विठ्ठलाच्या द्वारी" या ऐतिहासिक उपक्रमाचे सर्वत्र नागभीड नवखळा वासीय कौतुक करीत आहेत.