मानोरा : "आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून आपण संपूर्ण भारत भर "घर घर तिरंगा हर घर तिरंगा" अशा पद्धतीने "स्वराज्य सप्ताह" साजरा करून दि १३ ते दि १५ ऑगष्टपर्यंत, राष्ट्रध्वज तिरंगा घरोघरी, सन्मानपूर्वक फडकवून शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाच्या निर्देशाप्रमाणे दि १७ ऑगष्ट रोजी सकाळी ११ : ०० वाजता संपूर्ण भारतभर सामूहिक पद्धतीने राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीची भावना जागृत असल्याची प्रचिती दिली आहे. ज्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले. याच स्वातंत्र्यासाठी भगतसिंग,सुखदेव ,राजगुरू, चंद्रशेखर, बारा वर्षाचा बाबू गेनू विदेशी राजवटी खाली शहिद झालेत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून शुभलाम् सुफलाम् करण्याकरीता काहींनी आपला देशभक्त मुलगा गमावला ! काहींनी आपला क्रांतिकारक पति गमावला ! काहींनी आपला भाऊ गमावला ! तर काहींनी आपला बाप गमावला ! तेव्हा कुठे आपला भारत देश स्वतंत्र झाला .आणि देशात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. स्वातंत्र्याचा १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस तुम्हा आम्हाला दिसावा म्हणून राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज यांनी साहित्य लेखन केले. आणि आपल्या खंजेरीद्वारे समाजप्रबोधन केले. गुरुदेव तुकडोजी महाराज सांगतात, "निघू दे दिवस मंगल तो बघावया भारत अपुला ... या भारतात बंधुभाव नित्य वसु दे ...दे वरची असा दे ... ! अशा या स्वातंत्र्याची ... देशभक्तीची ... प्रेरणा सर्वांना रहावी याकरीता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" हा नारा दिला म्हणून शेंदुरजना अढाव येथे आप्पास्वामी शिक्षण संस्थेमध्ये सामुहिक राष्ट्रगीत कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता मानोरा तहसील कार्यालयाचे तहसीलदार , पंचायत समितील गटविकास अधिकारी,सभापती , आप्पा स्वामी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब , पंचायत समितीचे सदस्य मनोजभाऊ , शेतकरी नेते सचिन रोकडे आणि कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज राठोड इ मान्यवर मंडळी,महिला बचत , अंगणवाडी , सर्व कर्मचारी जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी, व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सामुहिक राष्ट्रगीता नंतर भारतमातेचा, महापुरुष, क्रांतिकारकांचा जयघोष करण्यात आला . व सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरी समाज प्रबोधनकार पंकजपाल महाराज राठोड यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांना प्राप्त झाले आहे.