अकोला : (पत्रकार संजय कडोळे) : महाराष्ट्रातील नाथ समाजाच्या विकासाकरीता स्वतंत्र महामंडळ स्थापनेकरीता वैदर्भिय नाथ समाजाच्या वतीने आज दि. 17/11/2023 रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. ह्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, लिंगायत, गुरव, रामोशी व वडार या चार समाजाच्या सर्वंकष उत्कर्षासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच विविध आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. अतिशय स्वागताहार्य हा निर्णय आहे. परंतु ही महामंडळे स्थापन करीत असतांना राज्य सरकारला बर्यापैकी म्हणजेच गुरव, रामोशी आणि वडार ह्या समाजापेक्षा मोठा आणि जास्त लोकसंख्या ( 20 ते 22 लाख) त्यातही अत्यंत मागासलेला असा नाथजोगी समाज हा दिसला नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आपले गुरु स्वं धर्मवीर आनंदजी दिघे हे नाथ संप्रदायाचे दैवत श्री मच्छिंद्रनाथ यांचे निस्सीम भक्त होते. आजही त्यांच्या आनंदाश्रमामध्ये मच्छिंद्रनाथांची मोठी प्रतिमा स्थापित आहे, आणि विशेष म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रातील नाथजोगी समाज हा आर्थिक दृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. सतत भटकंती करत असल्यामुळे आज एकविसाव्या शतकातही जातीचा दाखला, राशनकार्ड तसेच घरकुलापासून वंचित असल्यामुळे जवळपास पाल वजा घरात आजही राहतो आहे. सदर मुद्यावर मा बच्चूभाऊ कडू यांनी नागपूर अधिवेशना दरम्यान आंदोलनसुध्दा केलेले आपणांस ज्ञात आहे. वैदर्भिय नाथ समाज संघाच्या वतीने गेल्या चार ते पाच वर्षापासून सदर बाबीचा पाठपुरावा म्हणून बरीचशी आंदोलने व निवेदनाचे सत्र ह्याबाबत चालविले परंतु राज्य शासनाकडून त्याची दखल म्हणावी तशी घेण्यात आली नाही. मागील सरकारमध्ये तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण राज्यमंत्री, मा बच्चुभाऊ कडू यांचे दालनात मंत्रालय
येथे पत्र क्र. बैठक 2020/प्रक्र-28 / समन्वय इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नवीन प्रशासकीय भवन, 3 रा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई दिनांक 11/03/2020 तसेच पत्र क्र. बदक- 2020/प्र.क्र. 195 /मावक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नवीन प्रशासकीय भवन, 3 रा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई दिनांक 13/01/2021 नुसार संबंधीत प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील नाथजोगी समाजाच्या ज्वलंत समस्या त्या म्हणजे घरकुल, जातीचा दाखला, राशनकार्ड व नाथपंथीयांवर वारंवार होणारे हल्ले या विषयावर बैठक वैदर्भिय नाथ समाज संघाचे अध्यक्ष एकनाथ पवार व पदाधिकारीसोबत बैठक पार पडली.

परंतु शासनाची अनास्था म्हणा किंवा अधिकार्यांची काम करण्याविषयीची अनास्था याचा फटका विविध शासकीय सवलतीपासून बंचित असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील नाथजोगी समाजाला बसत आहे. नाथजोगी समाजाकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष असण्याचे कारण म्हणजे आम्हाला राज्यात राजकीय नेतृत्व नाही हे आहे का? आणि राजकीय नेतृत्व नसेल तर पुर्ण महाराष्ट्रात 20 ते 22 लाख लोकसंख्या असलेल्या मागास नाथ समाजाला आपण फक्त राजकीय स्वार्थापुरते वापरत आहात असे आम्ही समजायचे का? आपले सरकार समाजाभिमुख असून भगव्या विचारधारेवर चालते आणि आमचा नाथजोगी समाज म्हणजे कट्टर भगवानधारी.यांचे उदाहरण घ्यायचे झाले तर आमच्या नाथ समाजाची संपुर्ण भारतात ओळख ज्या व्यक्तीमुळे आहे ते उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री गोरखपूर येथील गोरखनाथ पिठाचे महंत आदर्श योगी आदित्यनाथ हे आहेत. जर कांग्रेसचे सरकार असलेलं राजस्थान राज्य शासन राज्यातील योगी, जोगी, नाथजोगी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी गुरु गोरखनाथ मंडळाची स्थापना करु शकते तर आपण का नाही ?या अनुषंगाने आपण सदर बाब गोभियांने विचारात घेऊन महाराष्ट्रातील 20 ते 22 लाख लोकसंख्या आणि वारकरी संप्रदायापेक्षाही आधी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व शासनाच्या विविध सवलतीपासून कोसोदूर असलेल्या नाथ समाजाच्या सर्वांगिन विकाससकरीता गुरु गोरखनाथ आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून संपुर्ण समाजाला उचित न्याय देण्यात यावा.सदर विषयावर मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे दिनांक 17/10/2023 रोजी त्यांचे नागपूर येथील शासकीय निवासस्थानी देवगिरी बंगल्यावर त्यांची भेट घेऊन सर्व पक्षीय 23 आमदार तथा 4 खासदार यांची शिफारसपत्रे मंत्रालय स्तरीय बैठक लावण्याकरीता त्यांचे स्वाधीन केलीत. परंतु आज 17/11/2023 रोजी सदर विषयाला जवळपास एक महिना पुर्ण होऊनही संबंधीत विषयाच्या बैठकीबाबत त्यांच्या स्तरावरून काहीही हालचाल झालेली नाही.

करीता सदर मुद्यावर आपण आजच्या तारखेपासुन येत्या दोन महिन्यात सकारात्मक विचार करावा अन्यथा विदर्भातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर वैदर्भीय नाथ समाज संघाशी संबंधीत नाथ समाजाकडून कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसल्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही व पुढील होणाऱ्या परिणामांकरीता आपले राज्य सरकार सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घेण्यात घ्यावी. असे त्यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदर आंदोलनात वैदर्भीय नाथ समाज संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार, सचिव संतोष सातपुते, अकोला जिल्हा समिती अध्यक्ष नागेश जाधव, सचिव विनोद चव्हाण, बुलढाणा जिल्हा समितीचे अध्यक्ष अविनाश इंगळे, वैदर्भीय नाथ समाज संघाचे विदर्भ संपर्क प्रमुख अभिषेक पाठक, अकोला जिल्हा समिती कार्याध्यक्ष प्रशांत उबाळे, वाशिम जिल्हा समिती अध्यक्ष रवींद्र इंगळे, अंकुश जाधव,हरिनाथ विधाते,सदानंद चिलवंत,देवनाथ इंगळे,शुभम वाडेकर, अशोक तिहिले,मयुर सातपुते तसेच जेष्ठ मार्गदर्शक पुंडलिक पाठक, भारत ठाकरे, पुंडलिक जाधव, डॉ प्रेम सुरंशे तसेच बरेचशे नाथबांधव उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....