वाशिम : येथील पुसद मार्गावर उभारण्यात आलेल्या उड़डाण पुलाचे लोकार्पण करुन सदर मार्ग रहदारीसाठी खुला करण्यात आला. मात्र, अदयापपर्यंत या पुलावर पथदिवे लावण्यात आले नाहीत. तर या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड़डे पडले आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी या पुलावरुन प्रवास करणे धोकादायक बनले आहे. तेव्हा, सदर पुलावर तत्काळ पथदिवे लावण्यासोबतच खड़डे बुजवावेत अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख डॉ. विशाल सोमटकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, रहदारीच्या सोईच्या दृष्टीने वाशीम ते पुसद मार्गावरील वीज वितरण कंपनी पासून ते शेलू फाट़यापर्यंत उड़डाणपुल उभारण्यात आला आहे. या मार्गावरुन वाशीम ते शेलुबाजार, पुसद, माहूर, कारंजा,अमरावती, नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मात्र, उडडाण पुलाच्या निर्मितीनंतर रस्त्याच्या दोन्ही कडेला विद़युत खांब लावण्यात आले नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो. शिवाय नव्यानेच बनविलेल्या या उडडाणपुलावरील रस्त्यावर खड़यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे याठिकाणी लहान मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. तेव्हा या मार्गावर मोठा अपघात होवून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उड़डाणपुलावरील रस्त्याच्या दोन्ही कडेला तत्काळ पथदिवे लावावेत. तसेच खड़डयांची डागडूजी करावी. अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख डॉ. सोमटकर यांनी केली आहे. यावेळी श्याम खरात, अनिल भडके, अब्दुल आकीब, कैलास थोरात, सुमित गोटे, राजु सहातोंडे, मदन भडके, संदीप कांबळे, संतोष श्रीमंत,अंबादास कांबळे, सै. अभीब,संतोष राजगुरु, गोपाल चव्हाण आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.