वेल्हा तालुक्यातील बोरावळे येथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेतील इयत्ता नववी व दहावी चे 40 विद्यार्थी , शिक्षक, सेवक भात लावणी करण्यासाठी उपस्थित होते.
बोरावळे येथील शेतकरी राजेंद्र शिळीमकर* यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यानी 15 गुंठे क्षेत्रात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भात लावणी केली. भात लावणी करताना मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.
आजूबाजूला हिरव्या रंगाची मुक्त उधळण , गुडघाभर चिखल, मधूनच येणारी पावसाची सर...
या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद विद्यार्थ्यानी लुटला.
शिळीमकर फार्म हाऊसवर
गणेश याने भात रोपे कशी लावायची याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. भात लावणीची लगबग सुरू असताना शेतात चिखल करत पारंपारिक भलरीची गीते एकमेकांना स्फूर्ती देत गायली.
भात लावणी करताना विद्यार्थ्यांना शेतकर्याच्या कष्टाची जाणीव झाली...यापुढे अन्न वाया घालवणार नाही याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
शेततळी, खाचरं ,बांध याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
मुलांनी शेतकर्यांना शेती विषयक विविध प्रश्न विचारले .....आणखी दुसरे कोणते पीक घेता .... कोणती खते वापरता ....सेंद्रिय शेती म्हणजे काय....?
परिसरात आंबा, नारळ, पेरू शेवगा ,चिकू ही झाडे होती ... पेरूच्या झाडावर प्रत्यक्ष चढून पेरू खाण्याचा मनमुराद आनंद मुलांनी लुटला.
शहरी भागातील मुलांना ग्रामीण संस्कृतीचा व कृषी क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला, नवीन पिढीतून भावी शेतकरी निर्माण व्हावेत या उद्देशाने या क्षेत्रभेटीचे आयोजन वनराई समन्वयक स्मिता जाधव यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णु मोरे ,शाळा समिती अध्यक्षा सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीत नववी व दहावीचे विद्यार्थी, पर्यावरण प्रमुख शिक्षक गौरी गोळे, योगेश्वर चव्हाण, सेवक चंद्रकांत कुडले भात लावण्यासाठी उपस्थित होते. सर्व मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.
आपल्या प्रतिक्रिया द्या....