तालुक्यातील जंगलव्याप्त गावांच्या हद्दीत वारंवार नरभक्षक वाघांचा वावर दिसुन येत आहे. तालुक्यातील मौजा हळदा येथील सतत दोन दिवसांत दोन व्यक्तींचा वाघाने जीव घेतला शिवाय आवळगाव, चिचगाव, वांद्रा, आकसापुर, बोळधा, कुडेसावली, मुळझा या गावांच्या हद्दीत सुद्धा वारंवार वाघांच्या कचाट्यात जीवित हानी होत आहे. अनेक पाळीव जनावरांचे व मानवांचे जीव यामुळे जात आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला लोकांना आपल्या शेतीच्या हंगामाची कामे पार पाडावी लागत आहेत आणि अश्या परिस्थितीत त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांनी शेतीची कामे करायची कि नाही असा प्रश्न जनसामान्यांना पडलेला आहे. वाघांची दहशत आता जंगल सोडुन गावाशेजारी दिसुन येत आहे. या सर्व बाबींचा वन विभाग प्रशासनाने गांभीर्याने विचार करुन अश्या नरभक्षक वाघांचा तात्काळ बंदोबस्त करावा. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने मा. उपवनसंरक्षक वनविभाग ब्रम्हपुरी यांना निवेदनामार्फत करण्यात आली. नरभक्षक वाघाचा येत्या दोन दिवसांत बंदोबस्त न झाल्यास वनविभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ईशारा सुद्धा पक्ष्याच्या वतीने देण्यात आला. यावेळी जेष्ठ कार्यकर्ते डॉ प्रेमलाल मेश्राम, तालुका महासचिव तथा जिल्हा आय टी सेल प्रमुख लिलाधर वंजारी, उपाध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष अनंतकुमार मेश्राम, जेष्ठ कार्यकर्ते डी एम रामटेके, प्रशांत रामटेके, व्ही डी साखरे, नितीन खोब्रागडे, धनपाल मेश्राम आदि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.