वाशिम - बाराव्या शतकात जगातील पहिली लोकशाही संसद स्थापन करुन त्यात सर्व जातीधर्माच्या लोकांना सन्मानाचे स्थान देणारे विरशैव लिंगायत समाजाचे महान समाजसुधारक, क्रांतीसुर्य, जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९३ व्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती व समाजबांधवांच्या पुढाकारातून शनिवार, १८ मे रोजी शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दाम्पत्यापोटी २५ एप्रिल ११०५ रोजी अक्षय तृतीयेच्या मूहुर्तावर महात्मा बसवेश्वरांचा जन्म झाला होता. महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात सांगितलेले विचार आजही लागू पडतात. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रांतील त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून संत बसवेश्वर यांच्याकडे पाहिले जाते. बसवेश्वरांनी शरण चळवळीच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे रणशिंगच फुंकले. या चळवळीत सामील झालेल्या पुरुषांना ’शरण’ तर महिलांना ’शरणी’ असे नाव देण्यात आले. या चळवळीने लिंगायत धर्माच्या पुनरूज्जीवनात लक्षणीय योगदान दिले. शरण चळवळीची मुख्य वैशिष्ट्ये समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह ही ठरली. मानव सर्व एकच आहेत, हे त्यांनी वचनाद्वारे सांगितले. महात्मा बसवेश्वरांच्या प्रेरणेमधून निर्माण झालेले वचनसाहित्य हे भारतीय साहित्याचा एक प्रमुख प्रकार ठरले. बसवेश्वरांची वचने सर्वजीवनस्पर्शी, सर्वजीवनव्यापी व सर्वजीवनप्रभावी आहेत. वचन साहित्यामधून महात्मा बसवेश्वरांनी मोलाचे संदेश दिले.
बसवण्णाची जयंती संपूर्ण जगात साजरी करुन त्यांचे वचन साहित्य व सर्व समाजाच्या भल्यासाठी त्यांनी केलेल्या महान कार्याचे स्मरण केले जाते. त्या अनुषंगाने महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती व समस्त विरशैव लिंगायत समाजबांधवांच्या सहयोगातून शनिवार, १८ मे रोजी शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शोभायात्रा मार्गस्थ होईल. तदनंतर काटीवेस, जुनी नगर परिषद, राजनी चौक मार्गे ही शोभायात्रा मार्गस्थ होवून शुक्रवारपेठ येथील श्री चिंतामणेश्वर मठ संस्थानमध्ये शोभायात्रेचा समारोप होईल. शोभायात्रेत काटा, सनगाव, पानकनेरगाव, शिरपूर जैन, पिंपळगांव, ब्रम्हा आदी ठिकाणचे महिला भजनी मंडळी सहभागी होतील. श्री चिंतामणेश्वर मठ संस्थानमध्ये समारोपीय कार्यक्रम होईल, तरी या जयंती कार्यक्रमात व शोभायात्रेत समाजाची अस्मिता फुलविण्याकरीता वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी सहकुटूंब उपस्थित राहुन सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समिती व समस्त विरशैव लिंगायत समाजबांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....