आज काळ बदलत असून त्याचबरोबर प्रत्येक माणसाची मानसिकता बदलत आहे. सर्वच स्तरात स्त्री-पुरुष, लहान मुले मद्यपान करतात. मनोरंजन म्हणून पत्ते खेळतात. नीतीमूल्ये हरवून व्यभिचाराकडे सर्वांचाच कल दिसून येत आहे. याच अधोगतीकडे पाऊल पडत असून, या अधोगतीला आपणच जबाबदार आहोत ना? आज माणसातली एकोप्याची, जिव्हाळ्याची, मैत्रीची भावना लोप पावली. ती जागा मत्सर, द्वेष, कटूता या अवगुणाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास माणसातील माणुसकी नष्ट झाली आहे. हीच स्थिती बघून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हातात खंजेरी घेऊन दुर्गुणाने मळलेली लोकांची मने स्वच्छ करण्यासाठी, ही मायभूमी व्यभिचाराने कलंकित होऊ नये म्हणूनच महाराज भगवंताला वर मागतात.
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे ।
दे वरचि असा दे ।
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे ।
मतभेद नसू दे, दे वरचि असा दे ।।
राष्ट्रसंत यांच्या विचाराने विदर्भातील प्रत्येक माणूस म्हणतो आहे, "आम्ही बी घडलो दास तुकड्यासंगे." राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्वप्नातील सुंदर व आदर्श गाव ही संकल्पना प्रत्येकाच्या मनामनात घर करून गेली आणि बरेच खेडी आज आदर्श गाव म्हणून उभे ठाकले. महाराजांनी आदर्श मानव समाज निर्माण करण्यासाठी रात्रंदिवस धावपळ करून जनतेला संबोधित केले. ते आपल्या प्रखर वाणीने म्हणतात.
गावा गावासी जागवा ।
भेदभाव हा समूळ मिटवा ।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा ।
तुकड्या म्हणे ।।
आम्ही घडण्यामागे राष्ट्रसंतांचे अमोल असे विचार आहेत. तेच विचार घेऊन गाव समृद्ध होण्याच्या वाटेवर आहे. असे संत झाले नाही आणि पुढे होणे शक्य नाही. राष्ट्रसंताची खरी तळमळ खेडेगाव सुधारणेकडे होती. कारण त्यांनी खेड्यातील परिस्थिती जाणली होती. ते म्हणतात.
हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे ।
हे सूत्र ध्यानी ठेवूनी खरे ।
आपले ग्रामची करावे गोजिरे ।
शहराहुनी ।।
खरोखरच राष्ट्रसंताच्या विचाराने तसेच ग्रामगीतेच्या नियमानुसार आम्ही आणि आमचे गाव घडले आहे. राष्ट्रसंतांच्या स्वप्नातले खेडेगाव निर्माण होईल यात शंका नाही. जर आपणाला खेडेगावाचा तसेच देशाचा विकास, माणूस व त्याचा समाज याला संपूर्ण सफल बनवायचे असेल तर महाराजांच्या ग्रामगीतेशिवाय दुसरा पर्याय नाही. राष्ट्रसंतांना शेतकऱ्याचे हाल बघवत नव्हते. या जगाचा तारणहार, पालणहार शेतकरी हरवला तर धान्य, फळे, भाज्या कुठून मिळणार. शेतकऱ्यांचे दुःख पाहून राष्ट्रसंत लिहतात.
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो ।
सकळांचे लक्ष तुजकडे वळो ।
मानवतेचे तेज झळझळो ।
विश्वामाजी या योगे ।।
आम्ही बी घडलो राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेमुळे. राष्ट्रसंतांनी गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती करताना व त्याचे कार्य भारतभर नेताना ह्या नैतिक अंगाकडे विशेष लक्ष दिलेले दिसते. या सामुदायिक प्रार्थनेमुळे गावातील लहान मुलमुली आणि तरुण मुल सुधारणावादी झालेले दिसून येते. राष्ट्रसंतांचा विचार खेडोपाडी या प्रार्थनेतून खरोखरच रुजला आहे. राष्ट्रसंत प्रार्थनेतून आर्त हाक त्यांनी गुरुदेवाला केलेली दिसून येते.
है प्रार्थना गुरुदेवसे,
यह स्वर्गसम संसार हो ।
अति उच्चतम जीवन बने ।
परमार्थमय व्यवहार हो ।।
आम्ही बी घडलो दास तुकड्यासंगे, म्हणणे वावगे होणार नाही कारण आज नवयुवक राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरीत झालेला आहे. राष्ट्रसंत म्हणतात आजचा तरुण हा उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे. त्याच्यावर कुटुंब जबाबदारी, समाज व राष्ट्राची जबाबदारी व कर्तव्यपालनाची जबाबदारी आहे. या युवकाला विश्वापर्यत पोहचण्यासाठी वं. राष्ट्रसंतानी मार्ग सांगितला तो म्हणजे सर्वसमभाव, समाजजागरण होय.
तन मन धन से सदासुखी हो ।
भारत देश हमारा ।
सद्गुणी हो यह देश की जनता ।
जीवन सुख सजवाने ।।
असा कृतिशील मार्ग युवकांना दाखविण्याचे काम प्रामाणिक कृतीतून अनेकविध कार्यक्रमातून भजन कीर्तनातून, ग्रामगीतेच्या शब्दाशब्दातून वं. राष्ट्रसंतानी केले. खरोखरच आम्ही बी घडलो दास तुकड्यासंगे !
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....