कारंजा : आमदार राजेंद्र पाटणी यांनी दोन महिन्यापूर्वी , कारंजा नगर पालिका हद्दीतील,शेकडो रस्त्यांचे भूमिपूजन केले. आमदार विकास निधीमधून हे रस्ते होऊ घातलेले असतांना अनेक रस्त्यांच्या कामांना अद्याप पर्यंत कारंजा शहरात प्रारंभच झालेला नाही. पावसाळा तोंडावर आलेला असतांना कारंजा नगर पालिकेकडून अद्याप रस्त्याच्या, नाली खोलीकरण,रुंदीकरण, नविन नाल्याचे बांधकाम, नाल्याची साफसफाई, रस्त्याचे बांधकाम, गावातील रस्त्यांचे डांबरीकरण व डागडूजी याकरीता सपशेल दुर्लक्ष्य केल्या जात असल्याचे वास्तव आहे. कारंजा नगर पालिकेत संचालक मंडळ बरखास्त झाल्यापासून कुणी कुणाचा वाली नाही. नगर पालिकेत प्रशासकीय सत्ता असतांना नगर पालिकेचे प्रशासक नगर पालिकेकडे ढुंकूनही पहात नाही. कारंजा नगर पालिकेला चोवीस तास १००% उपस्थिती देणारा मुख्याधिकारी नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांची अधिकारशाही सुरू आहे. जनतेचे प्रश्न रेंगाळलेले असतांना, कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचा सुद्धा कारंजा नगर पालिकेच्या अधिकार्यावर कोणताही अंकुश नाही आणि त्यामुळे कारंजा नगर पालिका व १००% मालमत्ता कर भरणा करणाऱ्या, निष्पाप नागरीकांना, शासन प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे वास्तव आहे. असे परखड मत समाजसेवी संजय कडोळे यांनी व्यक्त केले आहे.