कारंजा : श्रीक्षेत्र कारंजा लाड येथील ऐतिहासिक शक्तिपिठ असलेल्या श्री कामाक्षा देवी मंदिरात गेल्या नऊ दिवसात, देश विदेशातील जवळ जवळ लाखो व्यक्तिंनी दर्शनार्थी म्हणून भेट दिल्याचा अंदाज असून, मंगळवारी अखेरच्या महानवमीच्या दिवशी तर यात्रेकरु मातृशक्ति उपासकांनी गर्दीचा उच्चांक गाठला असल्याचे निदर्शनास आल्याचे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे ( गोंधळी ) यांनी कळवीले आहे . या संदर्भात अधिक वृत्त असे की कारंजा येथील नगर पालिका आणि शहर पोलीस स्टेशनला लागूनच, स्थानिक गोंधळी नगर येथे श्री कामाक्षा देवीचे जागृत संस्थान आहे . ह्या श्री कामाक्षा देवीची स्थापना पुरातन काळात कारंजा नगरीचे संस्थापक श्री करंज ऋषी यांनी केली असावी . अतिशय प्राचिन व ऐतिहासिक श्री कामाक्षा देवी आसाम राज्यातील गोहाटी च्या श्री कामाख्या देवीचे शक्तिपिठ म्हणून ओळखल्या जाते . त्यामुळे राजे शिवाजी महाराजांनी स्वतः श्री कामाक्षा देवीचे दर्शन घेतल्याचे सांगीतले जाते . श्री कामाक्षा देवी नवसाला पावणारी जागृत देवता आणि आंधळ्यांना दिव्यदृष्टी देणारी देवता म्हणूनही ओळखल्या जात असल्याने आश्विन शुद्ध शारदिय नवरात्रात येथे पूर्वी पासूनच यात्रोत्सव पार पडतो. श्री कामाक्षा देवी मंदिराचा कारभार महाजन कुटूंबाकडे आहे . अनेक लहान व्यावसायिक येथे आपली दुकाने सुद्धा थाटतात .त्यामुळे देश विदेशातून नवरात्रात येथे भाविक येत असतात . आज नवरात्राच्या शेवटल्या दिवशी तर दशनार्थीची अक्षरशः प्रचंड गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले . यावेळी यात्रेमध्ये कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिह सोनोने यांचे नेतृत्वात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात होता. दर्शनार्थी श्री कामाक्षा देवीचे दर्शन झाल्याने आनंदाने तृप्त होत असल्याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसून येत होते . आज विजया दशमीच्या दिवशी सुद्धा अशाच प्रकारची गर्दी असण्याची शक्यता आहे . असे सुद्धा संजय कडोळे (गोंधळी ) यांनी कळविले आहे .