कारंजा : सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रिय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या-ऐतिहासिक,धार्मिक व अतिप्राचिन अशा कारंजा नगरीतील श्री शारदिय नवरात्रोत्सवानिमित्त,श्री नवदुर्गोत्सव शांती,सलोखा,शिस्तबद्ध पद्धतीने,अतिशय आनंदाच्या उत्साहात पार पडला. गुरुवार दि ०६ ऑक्टोबर रोजी श्री नवदुर्गा मातेला स्थानिक मातृशक्ति उपासकांनी भावपूर्ण निरोप देतांना आनंदोत्साहात विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणूकीमध्ये आबालवृद्धांसह तरुण व महिला मंडळीची उल्लेखनिय उपस्थिती दिसून येत होती. केवळ एक दोन मंडळाचे लेझिम पथक आणि ढोल ताशा पथक सोडले तर सदर्हू मिरवणूकीमध्ये पारंपारिक क्रिडा प्रकार आणि लोककला मागे पडल्याचे प्रकर्षाने दिसून आले. यावर्षी जास्तित जास्त नवदुर्गा मंडळांनी डीजेला प्राधान्य दिले होते आणि तरुणाई डीजेच्या तालावर थिरकतांना दिसून येत होती.
शहरातील संत गाडगे बाबा चौकात शांतता कमेटीचे सर्वधर्मिय सदस्य श्री नवदुर्गा मंडळाचे जल्लोषात स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत होते. सायंकाळी ५:३० वाजता रिमझिम पाऊसाने हजेरी लावल्यामुळे प्रत्यक्ष पर्जन्यराजाने श्री दुर्गा विसर्जनाला मानाचा मुजरा केल्याची चर्चा होत होती. तर नवदुर्गा मंडळांची काहीशी तारांबळ उडाली होती.
जिल्हा पोलिस अधिक्षकाचे मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी जगदिश पांडे तसेच स्थानिक शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिह सोनोने यांचे नेतृत्वात, पोलिस, राखीव पोलिस तसेच गृहरक्षकदल यांचा चोख बंदोबस्त होता. सामाजिक कार्यकर्ते,शांतता समिती सदस्य आणि पत्रकार मंडळी निःस्वार्थ सेवा देऊन शांती व सलोख्या करीता कार्यरत दिसून येत होते. तर शहरातील विविध सामाजिक संस्था आणि व्यापारी बांधवांनी श्री नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीतील सहभागी कार्यकर्ते आणि दर्शकांकरीता ठिकठिकाणी खिचडी, चने उसळ, अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.