अध्यात्म हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून अहिंसा, सदाचार, नीती, एकात्मता, मानवता या गुणांचा अंगीकार करून आपले व इतरांचे जीवन सुखमय करणे ही आपल्या धर्माची शिकवण आहे. आज देशातील धर्म पार लयाला गेलेला दिसून येतो आहे. भारतीय संस्कृतीला नष्ट करण्याची परकीयांची पद्धतशीर धोरणे आणि गेल्या ५० वर्षापासून सत्तेच्या हव्यासापोटी परकीय धोरणांना पाठींबा देणारी सरकारे यांनी भारताचा सांस्कृतिक पायाच उखडण्याचा चंग बांधला. आज आपला समाज नीतीमूल्ये विसरून भोगवादाला बळी पडलेला दिसून येतो. आजची तरुणपिढी ध्येयहीन, व्यसनाधीन आणि शारीरिक. मानसिकदृष्ट्या दुर्बल होत चालली आहे. अशा परिस्थितीत वं. राष्ट्रसंतांचे धर्मचिंतन, अध्यात्मचिंतन हे समाजाच्या सर्व स्तरातल्या सर्व घटकांना सर्व काळी दिशा देणारे आहे. धर्माचा अर्थ महाराज सांगताना म्हणतात.
मुख्य धर्माचे लक्षण । त्याग, अहिंसा, सत्यपूर्ण ।
अपरिग्रह, ब्रम्हचर्य जाण । तारतम्ययुक्त ।।
प्रत्येकासी शरीर, मन । वाणी, इंद्रिये, बुद्धीप्राण ।
या सर्वांचे विकास साधन । तोचि धर्म ।।
धर्माचरणामुळे मनुष्य जीवनाचा विकास होतो. त्यामुळे प्रत्येकाला धर्माच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले पाहिजे तरच तो त्याप्रमाणे जीवन जगू शकेल, असे महाराज म्हणतात म्हणून "व्यक्ती व्यक्ती व्हावी धार्मिक" असे ते म्हणतात. ईश्वर मानावा की नाही यासंबंधी तुकडोजी महाराजांनी अतिशय निःसंदिग्घ प्रतिपादन केले आहे. ग्रामगीतेची सुरुवातच त्यांनी परमेश्वराला नमन करून केली आहे.
ओम नमोजी विश्वचालका । जगद्वंद्या ब्रम्हाडनायका ।
एकचि असोनि अनेका । भाससि विश्वरुपी ।।
लोकांतच ईश्वर बघावा, जनसेवा म्हणजेच ईश्वर सेवा. "जन तितुका जनार्दन । जाणुनि कार्य करावे ।" असे ते आग्रहपूर्वक सांगतात, पण त्याचवेळी ते मूर्तीपूजेचे देखील समर्थन करतात. मूर्तीपूजा कशी असावी असे ते पुढे सांगतात.
याचे ऐकावे उत्तर । प्रेम निर्मावे एका मूर्तीवर ।
तेचि क्रमाने करावे विश्वाकार । हाच हेतू पूजनाचा ।।
महाराजांच्या विचारात कुठेही एकांगीपणा नाही. संपूर्ण चराचर जर देवाने व्यापिले आहे, तर तो मूर्तीत नसेल का? असे ते म्हणतात. पण त्याचबरोबर ते कर्मठपणाला विरोध करतात.
मंदिरी बसोनि नाक दाबावे ।
त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे ।
दुःखीतासि प्रेमे पाणी पाजावे ।
हे श्रेष्ठ तीर्थस्थानाहुनि ।।
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्वधर्म समभावाचा सोपा अर्थ सांगताना ते म्हणतात.
"मानव" हेचि आपुले नाम ।
मग स्वधर्म म्हणजे मानवधर्म ।
मानवता हीच आहे खूण ।
सर्वधर्म समन्वयाची ।।
अशाप्रकारे समाजधारणा करतो तोच खरा धर्म आणि जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा, असा संदेश महाराज देतात. त्यांचे "हर देशमें तू, हर वेष तू" हे भजन तर सर्व प्रांत, धर्म, पंथ, संप्रदायाच्या भिंती तोडून समाजाला समानतेच्या एका सूत्रात बांधणारी विश्वशांतीची प्रार्थना म्हणावी लागेल. त्यांची दुसरी प्रार्थना ही आहे.
है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्गसम संसार हो ।
अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो ।।
आपण वं. राष्ट्रसंतांच्या आध्यात्मिक विचारांचे सार या एका प्रार्थनेमध्ये साठलेले आहे. प्रत्येकाने जर या प्रार्थनेचे चिंतन केले आणि त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला "स्वर्गसम" समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....