वंदनीय राष्ट्रसंत गुरुदेव तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेने, मानवतेसाठी कार्यरत असणणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटना आणि स्थानिक जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाची दिंडी सलग दहाव्या वर्षी (कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर ) यंदा परत श्रीक्षेत्र कारंजा ते श्रीक्षेत्र तुळजापूर - श्रीक्षेत्र पंढरपूर करीता रवाना होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील खंडार यांनी प्रसार माध्यमाला दिली आहे . श्री जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाद्वारे दरवर्षी कारंजा ते पंढरपूर पर्यंत दिंडी सोहळा काढण्यात येत असतो . मात्र गेल्या दोन वर्षातील कोरोना महामारीने शासन निर्देशाने मंदिर देवस्थान बंद ठेवण्यात आल्याने दिंडी सोहळाच बंद पडलेला होता परंतु सध्या शासनाने नियम शिथील करीत दिंडी सोहळ्यांना परवानगी दिल्यामुळे वारकरी परत एकदा नवचैतन्याने दिंडी प्रमुख संजय कडोळे यांच्या नेतृत्वात दि .२८ जून २०२२ रोजी,श्रीक्षेत्र तुळजापूर श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना होणार असून आपल्या सोहळ्यादरम्यान श्रीक्षेत्र येरमळा येथील येडाईच्या डोंगरावर कारंजा येथील वारकरी, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" या अभंगाच्या गजरात,सहस्त्र बिजारोपण सोहळा घेऊन, वृक्षलागवड करतील . त्यासाठी विविध झाडांच्या बिया घेऊन ही मंडळी जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे . सदहु दिंडीमध्ये दरवर्षी निराधार - दिव्यांग व महिला मंडळीचा समावेश असतो . संजय कडोळे यांचेसह हभप अजाब महाराज ढळे, कांताबाई लोखंडे, अन्नपूर्णा बाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे, सुधाकर इंगोले आदी शेकडो मंडळी जाणार असल्याचे कळविण्यात आलेले असून ह्या मंडळीचा मुक्काम श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्रीसंत गजानन महाराज मंदिर मठावर राहणार आहे . त्याकरीता दिंडीसोहळ्याचे व्यवस्थीत नियोजन करण्यात आलेले असून मार्गात ठिकठिकाणी शासनाच्या राष्ट्रिय कार्यक्रमावर जनजागृतीसह समाजप्रबोधन करण्यात येणार आहे .