कारंजा : "व्यसन हे सुटू शकते . फक्त ते व्यसनाधिन झालेल्या व्यक्तिच्या मनात हवे. तुमचे काही नुकसान झाले तर व्यसन करणे हा उपाय नव्हे. त्याकरीता आपण आपले मन हरीभजन, हरी किर्तनात रमवीले पाहिजे. नरजन्म हा पुन्हा नाही. कोरोना सारख्या महामारीतून आपण वाचलो हे आपलं अहोभाग्य आता पुढील आयुष्य व्यसनमुक्त होऊन जगा. माहिला मंडळीनी सुद्धा घरातच अबोला न धरता सुनेला आपली लेक माना . व सुनांनी सासूला आई माना . आपल्या आईवडिलांना वृध्दाश्रमात पाठवू नका. मुलांवर चांगले संस्कार घडवा. धनाने नव्हे मनाने मोठे व्हा. तुमच्या वैभवशाली, धार्मिक अशा सर्वधर्मियांच्या कारंजा नगरीत आध्यात्म्य रूपा ज्ञानाचा दिपक पेटत असलयामुळे आज दिवाळीचा आनंद दिसत आहे . तुम्ही दुसऱ्याचे दुःख वेचून, व्यसनापासून समोरच्या व्यक्तिला मुक्त करून आनंदी केलं पाहिजे. तसेच विद्यमान मुख्यमंत्री आणि सरकारने माणूस घडविण्याच्या सुसंस्काराचा विषय शिक्षणामध्ये समाविष्ट केला पाहीजे" असे प्रबोधन सुप्रसिध्द राष्ट्रीय किर्तनकार व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांनी आपल्या किर्तनामधून दि. ३ नोहेंबर रोजी केले. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेच्या वतीने व्यसनमुक्ती समाजप्रबोधना करीता स्थानिक मुल्जिजेठा हायस्कूलचे पटांगणात डॉ ज्ञानेश्वर भगवान गरड यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजीत केला होता. यावेळी सर्वप्रथम, महाराजांचे परमशिष्य कारंजा शहरातील दारुबंदी व्यसनमुक्तीचे पहिले प्रचारक व हजारो व्यसनाधिनांना व्यसनमुक्त करणारे दिलीपजी गिलडा, ईरो फिल्मस् ऍन्ड एन्टरटेन्टमेन्ट, म्युझिक संचाचे संस्थापक इम्तियाज लुलानिया, रोमिल लाठीया, विदर्भ लोककलावंत संघटनेचे संस्थापक दारुबंदी व्यसनमुक्ती प्रचारक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे, व्यसनमुक्ती सम्राट लोमेश पाटील चौधरी, गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी आजिवन प्रचारक ग्रामगीताचार्य गोपाल महाराज काकड, विजय पाटील खंडार, संतोष महाराज केळकर, सुनिल गुंठेवार, दत्तात्रय बेलबागकर, रामबकस डेंडूळे, अभा नाटय परिषद मुंबईचे नंदकिशोर कव्हळकर, नाटय परिषद कारंजा शाखेचे श्रीकांत भाके, हफिज खान, पांडूरंग माने, पत्रकार समिर देशपांडे,किर्तनकार हभप विनायक पाटील गुंजाटे, माजी नगराध्यक्षा उर्मिलाताई इंगोले, भारत गॅसचे संचालक शेखर बंग, चित्रकथी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ अवताडे, माजी सैनिक संघटनेचे कार्यकर्ते इत्यादी मंडळीनी सर्वप्रथम व्यसनमुक्ती किर्तन प्रबोधना करीता आलेल्या हभप मधुकर महाराज खोडे यांचे स्वागत केले आणि नंतर वाढदिवसानिमित्त डॉ ज्ञानेश्वर गरड यांना शुभेच्छा दिल्यात. हभप मधुकर महाराज खोडे यांच्या किर्तन कार्यक्रमाचे संचलन इम्तियाज लुलानिया, नागरे मॅडम आणि हभप विनायक पाटील गुंजाटे यांनी केले तर किर्तन कार्यक्रमाला टाळकरी म्हणून साथसंगत चिंचखेड ( वढवी ) येथील श्री संत एकनाथ महाराज सांप्रदायिक भजनी मंडळाने केली. महत्वाचे म्हणजे याप्रसंगी व्यसनमुक्ती करीता झोळी घेऊन हभप मधुकर महाराज खोडे यांनी भिक्षा मागीतली असता कारंजा पंचक्रोशितील शेकडो सज्जनांनी, महाराजांच्या झोळीत व्यसनाच्या वस्तूचे [दारू, तंबाकू, गुटखा] दान देऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली, याप्रसंगी मुल्जिजेठा हायस्कूलचे संपूर्ण पटांगण उपस्थित रसिकश्रोते मंडळीनी गच्च भरलेले होते. एकंदरीत हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान उपस्थितांच्या समाधाना मधून दिसून येत होते. असे वृत्त प्रत्यक्षदर्शी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी स्वतः छायाचित्रण आणि वृत्तसंकलन करून कळवीले आहे.