कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाद्वारे मागील 9 वर्षा पासून समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनांचा व शाहू,फुले,आंबेडकर व संतांची विचारधारा तळागाळातील उपेक्षित वंचित व दुर्बल घटकांपर्यंत प्रचार व प्रसार करणाऱ्या समतादूताच्या न्याय हकासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून पुणे ते मंत्रालय मुंबई पर्यंतचा पायी लॉंग मार्च केला असून 155 किमी पायी चालत लाँगमार्च दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी वाशी-नवी मुंबई येथे पोहचला असता मुंबई पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानावर मुंबई येथे सुखरूप पोहचविले.सद्यस्थितीत आझाद मैदानावर त्यांचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा आजचा 18 वा दिवस आहे.जो पर्यंत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते असलेले सन्मानानिय मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे भेटण्याची वेळ देत नाहीत,तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील ह्या निर्णयावर सर्व समतादूत ठाम आहेत. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील समतादूतांनी या लॉगमार्च आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला असून त्यांचे समाजकल्याण विभागात समायोजन व्हावे व तालुका स्तरावर समाजकल्याणचे कार्यालय सुरू करावे ही प्रमुख, रास्त व लोककल्याणकारी मागणी ते करीत आहेत.बार्टी मुख्यालयातुन सकारात्मक अहवाल शासनास सादर केलेला आहे.परंतु अद्यापही तो अहवाल मंत्रालय स्तरावर प्रलंबित असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम समतादूतांनी पायी लाँगमार्च काढून शासनाला, झोपेमधून जागे करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे.सामाजिक न्याय विभाग मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे असल्याने प्रत्यक्ष त्यांची भेट घेण्याचा निर्णय समतादूतांनी घेतलेला आहे.आंदोलन सुरू असताना 2 वेळेस पोलिसामार्फत समतादूत शिष्टमंडळाला मुख्यमंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी नेण्यात आले परंतु दोन्ही वेळेस मुख्यमंत्री महोदय ना. एकनाथजी शिंदे यांची भेट झालेली नाही.जो पर्यंत मा.मुख्यमंत्री महोदयांची भेट होत नाही तोपर्यंत हा लाँगमार्च चालू असणार आहे.पायी प्रवास करणाऱ्या समतादूतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.भर पावसात सुद्धा त्यांचा प्रवास सुरूच होता.समतादूत हा पार ग्रासून गेलेला आहे.अनेक समतादूतांची प्रकृती चिंताजनक असून त्यांचे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.अनेक महिला समतादूत भगिनी आपल्या लहान लेकरांना घरी ठेवून आलेल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरू,घाट रस्ता,राहण्याची व्यवस्था नाही,नाईलाजाने जेवणाची सोय जी सोय उपलब्ध होईल त्यावर समाधान मानत,पायांना अक्षरशः सुज येवून फोड आलेले आहेत.अशा बिकट मरण यातना सोसून जीवाच्या आकांताने त्या पायपीट करीत मुंबईत दाखल झालेल्या आहेत. तरी देखील शासन कोणतीही दखल घेत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली जात आहे. मागील 9 वर्षा पासून पूर 12500/- मध्ये कार्यरत असलेल्या काही समतादूतांची वयोमर्यादा ही उलटून गेलेली आहे.तुटपुंज्या मानधनातील त्यांचे चार ते पाच हजार रुपये केवळ प्रवासात खर्च होत असल्याने उर्वरीत पैशात आपले कुटुंब कसे चालणार,मुलांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? ह्या भविष्याच्या विवंचनेने समतेच्या या दूतांना ग्रासले आहेत. तरी.मुख्यमंत्री महोदय ना. एकनाथजी शिंदे यांनी वेळ देऊन आमच्या व्यथा समजून घ्याव्या अशी विनंती समतादूत यांच्या तर्फे करण्यात येत आहे.असे वृत्त वाशिम जिल्ह्यातील कारंजाच्या समतादूत प्रणिता दसरे यांनी आझाद मैदान मुंबई येथून, महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.