महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवि, समाज सुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव. मूळनाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म बंडोजी व मंजुळामाता (वंशापाती ठाकूर, ब्रम्हभाट) या दांपत्यापोटी विदर्भातील यावली शहीद जि. अमरावती येथे झाला. भक्ती संपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर होती. पंढरीचा पांडुरंग अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या संत परंपरेत अनेक अठरापगड जातीचे संत निर्माण झाले आणि पांडुरंगाचे निस्सिम भक्त बनले. विष्णुमय रुप म्हणजे श्री विठ्ठल यामध्ये कुणाचेही दुमत नाही. विष्णुची भक्ती करतात म्हणून वारकऱ्यांना वैष्णव म्हणतात.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम अमंगळ ।।
१९ व्या शतकामध्ये जन्मलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या घरामध्ये पंढरीच्या वारीची परंपरा त्यांच्या आजी आजोबांनी जोपासली. तीच परंपरा तुकडोजी महाराजांनी पंढरीची पहिली यात्रा विनातिकीट रेल्वेने धक्के मुक्के आणि मार खात पूर्ण केलेली होती. यात पंढरीच्या पांडुरंगाच्या हरीनामाची आस होती. महाराजांनी पंढरीच्या वारीत कधीही खंड पडू दिला नाही, कारण पंढरीचा कण आणि कण विठ्ठलमय झालेला त्यांना दिसून आला म्हणूनच त्यांना भक्ताच्य हाकेला धाऊन जाणाऱ्या आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या विठ्ठलाच्या रुपात जीवलग सखा दिसला. राष्ट्रसंत आपल्या भजनात म्हणतात.
चला हो पंढरी जाऊ ।
जिवाचा जिव लगा पाहू ।।
त्यांनी पांडूरंगाची भक्ती करा, असा साधासोपा मंत्र सर्व सामान्यांना दिला. भक्तीनेच मुक्ती प्राप्त करता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. म्हणूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
वाचे विठ्ठल गाईन ।
नाचत पंढरी जाईन ।।
शेवटी भजन विठ्ठलासमोर म्हणून त्यांच्या चरणी सेवा अर्पित केली. विठ्ठलाला शेवटी प्रार्थना करताना ते म्हणतात.
येवू दे दया आतातरी गुरु माऊली ।
या आयुष्याची दोरी कमी जाहली ।।
अशी हाक मारली. ज्या विठ्ठलाच्या साक्षीने भजन सेवा सुरु केली. शेवटी त्याच्या समोरच भजन सेवा संपविली. महाराजांनी भगवान श्रीकृष्ण आणि श्री विठ्ठल यांच्यामध्ये कधीच भेद केला नाही. श्रीकृष्णावर १०८ भजने लिहिली असली तरी श्री विठ्ठल, पंढरी महात्म आणि नामाचे महत्त्व यावरही भजने आणि अभंग लिहलेले आहे. "मंथन किया हर धर्मका , हर पंथका" आणि "काशी भी देखी , मथुरा भी देखा ।" म्हणणाऱ्या महाराजांना भारतातील सर्व तीर्थक्षेत्राचे भ्रमण केल्यानंतर शेवटी म्हणावे लागले.
पंढरीचे सुख नाही कोण्या धामा ।
पंढरपुरात राष्ट्रसंतांना मिळाली
ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती
पुण्यक्षेत्र पंढरपूरच्या वाळवंटात चंद्रभागेच्या तिरावर बसले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
तेथे दृष्टांत होई अद्भुत ।
कासया करावी विश्वाची मात ।।
प्रथम ग्रामगीताची हातात ।
घ्यावी म्हणे ।।
"ओम नमोजी विश्वचालका" या मूळ अक्षरा पासून राष्ट्रसंतांनी धावत्या प्रवासामध्ये ग्रामगीता हा युगग्रंथ पूर्ण केला. ग्रामगीतेत अंधश्रद्धा, ग्राम स्वच्छता, स्त्री पुरुष समानता, कुटूंब कल्याण, महिला विकास, ग्रामविकास हे सर्व मुद्दे राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत समाविष्ट केली. सामुदायिक जिवनातून विकास कसा साधावा, हेही ग्रामगीता ग्रंथ सांगते.
२२ जुलै १९५३ च्या आषाढी एकादशीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना पुण्यभूमी पंढरपूर येथे ग्रामगीता लिखाणाची स्फूर्ती मिळाली. ग्रामगीता आदर्श नागरिक घडविण्याची गुरुकिल्ली आहे.
पुण्यक्षेत्र पंढरपुरी ।
बैसलो असता चंद्रभागे तिरी ।।
स्फुरू लागली ऐसी अंतरी ।
विश्वाकार वृत्ती ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पंढरीचे वारकरी आणि विठ्ठलभक्त होते तसेच पंढरपुरातच ग्रामगीता लिखाणाची सुरुवात केली. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी चरणी विनम्र प्रणाम ! जय हरी विठ्ठल !!
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
आपल्या प्रतिक्रिया द्या....