चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधातील कारवाईत आजपर्यंतची सर्वात मोठी कामगिरी बजावली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (L.C.B.) पोलिसांनी चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही फाट्याजवळ सापळा रचून मुंबईहून आलेल्या एका अंमली पदार्थ विक्रेत्यास अटक करून त्याच्याकडून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी (MEPHEDRONE) पावडर आणि एकूण ३५,०७,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे काल रविवारी ०५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना, वसीम इमदाद खान (वय ३७) रा. बैगनवाडी, साईबाबा मंदिराजवळ, गोवंडी, मुंबई) हा एम.डी पावडर विक्रीसाठी चंद्रपूरकडे येत आहे अशी माहिती मिळाली. या माहितीवरून नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरवाही फाटा, एच.पी. पेट्रोल पंपासमोर सापळा रचण्यात आला. थोड्याच वेळात आरोपी त्याच्या एमएच-१० ईक्यू-०४२१ क्रमांकाच्या कारमधून तेथे आल्यावर पोलिसांनी त्याला वेढा घालून ताब्यात घेतले.
तपासात आरोपीकडून प्लास्टिकच्या प्रेसलॉक पिशवीत ठेवलेले ५२८ ग्रॅम एम.डी पावडर (प्रति ग्रॅम दर ५,००० रुपये - एकूण किंमत २६,४०,०००/-), मोबाईल फोन, रोकड, आणि कार असा एकूण ३५,०७,४८० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन पडोली, जिल्हा चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई त सहभागी अधिकारी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (L.C.B.) अमोल काचोरे, यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांकेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे, सुनिल गौरकार, तसेच पो.ह.वा. सुभाष गोहकार, इम्रान खान, सतिश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, पो.शि. हिरलाल गुप्ता, शंशाक बदामवार, म.पो.ह.वा. विजयमाला वाघमारे, चालक प्रमोद डंभारे आणि सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरच्या कर्मचाऱ्यांनी केली.
ही कारवाई चंद्रपूर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी लढ्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या या यशस्वी मोहिमेमुळे नशाविरोधी लढ्याला मोठी बळकटी मिळाली आहे.
२०२५ मध्ये चंद्रपूर पोलिसांचा नशाविरोधी मोर्चा
सन २०२५ मध्ये आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत १५७ गुन्हे नोंदवून १९२ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून एकूण ₹८०,५९,७७४ किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
महत्वपूर्ण आकडेवारी :
गांजा प्रकरणे : २६ गुन्हे नोंद, ५५.२४ किलो गांजा जप्त, ४० आरोपींवर कारवाई - किंमत ₹६,६२,१६४/-◾एम.डी (MEPHEDRONE): १४ गुन्हे, ७२२.६१४ ग्रॅम पावडर जप्त, ३१ आरोपींवर कारवाई - किंमत ४३,७८,०६०/-
ब्राउन शुगर: १ गुन्हा, २९८ ग्रॅम जप्त, २ आरोपींवर कारवाई - किंमत ३०,१९,५५०
◾अंमली पदार्थ सेवन करणारे: १५६ गुन्हे, १८६ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
"नशामुक्त चंद्रपूर" अभियानाने घेतला जोर
चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने "DRUG FREE CHANDRAPUR CAMPAIGN" या भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अंतर्गत शाळा, महाविद्यालयांत "Say No to Drugs - Yes to Life" व्याख्याने आयोजित केली जात आहेत. तसेच जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर सायकल रॅली, ध्यानशिबिरे, रॅली, पोस्टर व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. १५ ऑगस्ट २०२५ रोजी पालकमंत्री मा. श्री. अशोक उइके यांच्या हस्ते अभियानाचे फ्लेक्स अनावरण करण्यात आले.गणेशोत्सव व नवरात्र दरम्यान नशामुक्तीचे फलक प्रदर्शन भरविण्यात आले. होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, युवा मंडळे, महिला समित्यांचा सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा पोलिसांचे नागरिकांना आवाहन
चंद्रपूर जिल्हा पोलीसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की अंमली पदार्थ विक्री किंवा सेवनासंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ डायल ११२ किंवा ७८८७८९०१०० या क्रमांकावर संपर्क साधावा. आपली ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल."
आपल्या प्रतिक्रिया द्या....