स्व.महादेवराव लाकडे गुरुजी यांचा ४३ स्मृति दिन जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे संपन्न झाला.यावेळी प्रमुख व्याख्याते परमेश्वर व्यवहारे यांनी वाचनाचे महत्त्व समजून सांगताना’ ग्रंथ संग्रह करणे हा विध्यर्थांचा ध्यास असला पाहिजे आणि वाचन हा तुमचा श्वास असला पाहिजे’ असे प्रतिपादन त्यांनी केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य मीनाताई भोने,प्रमुख वक्ते म्हणून परमेश्वर व्यवहारे,शाळा समिती अध्यक्षा दिपाली लोमटे, प्राचार्य प्रा.सुरेश राठोड,पार्वताबाई लाकडे,रंजना गायधने,डॉ. प्रेमलता आसावा, सुनील पुरी व पर्यवेक्षक विकास रुईकर विचारपिठावर उपस्थित होते.
पुढे परमेश्वर व्यवहारे म्हणाले की,जेव्हा प्रत्येक शाळेत ग्रंथालय व ग्रथपाल असेल तेव्हा विद्यार्थ्यांची वाचन अभिरुची वाढून वाचन संस्कृतीचा प्रसार होऊ शकतो,मात्र आज 60%शाळांमध्ये ग्रंथालय व ग्रंथपाल नाहीत.अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. .ते पुढे म्हणाले की वाचनातून आचरणात बदल होणे महत्त्वाचे. मी कोण? हा प्रश्न स्वतःला विचारा.स्वतःला वाचा म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल,निसर्गाला वाचा,व्यक्तींना वाचा व वेदनेची भाषा वाचा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. महादेवरावजी लाकडे गुरुजी यांना अभिवादन करताना शाळेच्या एका शिक्षकाचा स्मृतिदिन इतक्या वर्षानंतर ही संपन्न होतो,यातच त्या शिक्षकांच्या कार्याची महती दडलेली आहे असे ते पुढे म्हणाले.
यावेळी स्व.महादेवराव लाकडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाची स्थापना १९५६ ची असून १९५७– ५८ ला पहिला प्रतिभा नावाचा वार्षिक अंक निघाला होता. मधल्या काळात हा अंक बंद झाला होता. २०२४ ला गुरुजींच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या कविता व त्यांनी काढलेले चित्र तसेच शिक्षकांच्या कविता अशी प्रतिभा वार्षिक अंकाची काव्यांजली लाकडे गुरुजींना वाहण्यात आली.इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मराठी विषयात विद्यालयातून खुशी राजेश खोपे व जान्हवी गजानन शिंगाडे व इयत्ता बारावीच्या परीक्षेत समृद्धी नितीन सवाई सर्वात जास्त गुण मिळाल्याने त्यांना महादेवराव लाकडे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.लाकडे गुरुजी यांची मुलगी रंजना गायधने व नात कोमल भगत व स्वरा लाकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी लाकडे गुरुजी यांचे माजी विद्यार्थी डॉ. प्रेमलता आसावा व सुनील पुरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्राचार्य प्रा.सुरेश राठोड यांनी स्व.लाकडे गुरुजी यांचे कार्य आम्हाला सतत प्रेरणा देत राहते याविषयी सांगितले. अध्यक्ष भाषणातून मीनाताई भोने यांनी विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचन करावे याविषयी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली खोडके प्रास्ताविक नीता तोडकर यांनी तर आभार गोपाल खाडे यांनी मांडले. स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला लाकडे परिवारातील सदस्य, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.