वाशिम: सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात आणि मुख्यतः आपल्या वाशिम जिल्ह्यात निवडणूका जाहीर झाल्या असून, निवडणूकांसंदर्भात बोलतांना,आपल्या लोककलेद्वारे विविध सामाजिक व राष्ट्रिय जनजागृती कार्यक्रमासह जनतेचे मनोरंजन आणि अंधश्रध्दा निर्मूलन व्यसनमुक्ती करणाऱ्या साहित्य आणि कलाक्षेत्रात सक्रीय असणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले की,आमच्या न्यायहक्काच्या विविध समस्या सोडविण्याकरीता बांधील राहणाऱ्या राजकिय पक्ष आणि उमेद्वाराला आम्ही पाठींबा जाहीर करणार आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,विदर्भ लोककलावंत संघटना ही लोककलावंतांची अग्रणी संघटना म्हणून ओळखल्या जाते.कारंजा नगरीमध्ये अगदी शून्यातून ह्या संघटनेचा जन्म झालेला असून आज रोजी संपूर्ण जिल्ह्यात, विदर्भ लोककलावंत संघटनेचे जवळ जवळ तिन हजार कलाकार सदस्य कार्यकर्ते आहेत. ( त्यामुळे लोककलावंतानी मनात आणले तर आपल्या लोककला, किर्तन, प्रवचन, गोंधळ जागरणाच्या कार्यक्रमामधून जनजागृती करून खेडोपाडी गावोगावी संपूर्ण मतदार संघातील जनतेचे मत परिवर्तन लोककलावंत हे एका दिवसात करू शकतात.) असो,
ह्या संघटनेने इ.सन 2017 पासून नागपूर येथील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो या प्रत्येक ठिकानी विदर्भ लोककलावंत संघटनेने आपल्या कलाकारांच्या न्यायहक्काच्या विविध मागण्यांकरीता वेळोवेळी मोर्चे, उपोषण,धरणे आंदोलन,चटणी भाकरी आंदोलन करून त्यापैकी अंशतः मागण्या देखील मंजूर करून घेतलेल्या आहेत.त्यापैकी महत्वाच्या मानधन वाढीच्या मागणी करीता देखील लोककलावंताच्या या संघटनेने हजारो लोककलावंताच्या भरगच्च उपस्थितीत दि.24 जानेवारी 2024 रोजी "विराट क्रांतिकारी धरणे आंदोलन" करून शासनाला लोककलावंताच्या मानधन वाढीच्या मागण्याबद्दल जागे केलेले होते.त्यामुळे अखेर शासनाने शासन आदेश काढून कलावंताच्या मानधनात दुप्पटीने सरसकट वाढ देवून,मानधनाची दरमहा देय रक्कम पाच हजार रुपये केलेली होती.ही मानधन वाढ म्हणजे विदर्भ लोककलावंत संघटनेच्या विराट क्रांतीकारी धरणे आंदोलनाचा आणि लोककलाकारांच्या एकजुटीचा विजय असून त्यामुळे संघटनेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरलेली आहे. तसेच या नंतर ही शासन दरबारी संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबीत आहेत.जसे की, १) लोककलावंताच्या पुनर्वसनाकरीता त्यांच्या निवासाकरीता शासनाने भुखंडासह मोफत घरकुल योजना राबवावी. २) लोक कलावंताना रेल्वे आणि बसमध्ये तिकीटमध्ये सवलत आणि आरक्षण मिळावे. ३) लोककलावंताच्या मुलामुलींना मोफत शिक्षण असावे. ४) कारंजा येथे लोककलावंतासाठी सांस्कृतिक सभागृह व्हावे.आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे ५) लोककलावंतासाठी विकास महामंडळ स्थापन करून कलावंताच्या सुखं दुःखासाठी राखीव निधी उपलब्ध करण्यात येऊन त्यामधून लोककलावंताच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी,विवाहासाठी, व्यवसायासाठी,आजारासाठी मदत व पुनर्वसनासाठी सहकार्य आणि व्यावसायिक कर्जपुरवठा करण्यात यावा. ह्या व इतर मागण्या शासनाकडे प्रलंबीत आहेत.तसेच सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका जाहीर झालेल्या असून, "लोककलावंत हा देखील महाराष्ट्राच्या संस्कृती व परपरंपरेचा अविभाज्य घटक असून लोकशाहीचा मतदार आहे याची जाणीव ठेवून प्रत्येक राजकिय पक्ष आणि उमेद्वाराने आपल्या जाहिरनाम्यात लोककलावंताच्या मागण्यांचा उल्लेख प्रकर्षाने ठळकपणे करावा.आणि लोककलावंताच्या समस्या सोडविण्यासाठी बांधील रहावे." लोककलावंताच्या समस्या सोडविण्यास बांधील राहणाऱ्या राजकिय पक्ष किंवा उमेद्वारालाच आमचा पाठींबा आम्ही जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध कलाक्षेत्रातील आमच्या हजारो कलाकारांशी चर्चा करून पाठींबा देणार असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ जनसेवक संजय कडोळे यांनी स्पष्ट केले आहे.