गडचिरोली : तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदार संघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही. असा प्रश्न विचारणाऱ्या एका युवकाला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी तुझ्या एका मताने मी निवडून येतो का, असे सुनावले. समाजमाध्यमावर या दोघांमधील कॉल संवादाची "ऑडिओ क्लिप"व्हायरल झाली असून आदिवासी युवकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, आमदार होळींनी आरोप फेटाळले आहे.
जिल्ह्यात तलाठी आणि वनरक्षक भरतीमध्ये पेसा अंतर्गत सर्वाधिक जागा आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे "ओबीसीमध्ये" अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. या भरतीत ओबीसींना बरोबरीने स्थान देण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यासंदर्भात गडचिरोली भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित करून ही पदभरती रद्द करा अशी मागणी केली. मात्र, आदिवासी युवकांमध्ये यावरून असंतोष पाहायला मिळत आहे. याविषयी जाब विचारण्यासाठी एका युवकाने आमदार डॉ. देवराव होळी यांना कॉल करून ‘ तुम्ही आदिवासींचे नेतृत्व करता मग त्यांची बाजू का मांडत नाही, पदभरतीत इतर समाजाच्या जागा वाढवून देण्याची मागणी करण्याऐवजी भरतीच रद्द करा अशाप्रकरची मागणी का केली, याबद्दल विचारणा केली आहे.
दोघांमध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा संदर्भात देखील संभाषण झाले आहे. परंतु आमदार होळी यांनी तुझ्या एका मताने निवडून आलो काय, असे सुनावल्यामुळे समाजमाध्यमावर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. याबद्दल आमदार होळी यांना विचारणा केली असता, त्यांनी आपला सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न असून कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही असे सांगून विरोधकांनी चुकीच्या पद्धतीने ही कॉल सवांदाचीऑडियो क्लिप"व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.